चलो राणीबाग…पाना फुलांचे कार्टून्स बघायला

384

मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात येत्या लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेच्या दिशेने निश्चितच वळणार आहेत. या पाहुण्यांमध्ये मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स असणार आहेत! विशेष म्हणजे ही सर्व कार्टून्स पाना फुलांपासून साकारली जाणार आहेत. निमित्त आहे ते येत्या ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान आयोजित होणारे वार्षिक उद्यान प्रदर्शन !

1 2

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे, ते म्हणजे फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह. त्याचबरोबर ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे फुले आणि भाज्या यांचा समावेश देखील यंदाच्या उद्यान प्रदर्शनात असणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणा-या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दि. ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणा-या समारोपीय कार्यक्रमातही मान्यवरांची उपस्थित असणार आहे.

3 2

(हेही वाचा पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता कमी

यंदा कार्टून्सची संकल्पना

दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आता मुंबईची एक ओळख ठरु लागले आहे. लहान मुलांच्या भाव विश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या अंतर्गत पाना – फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’ देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.

5 2

बोनसायचे शेकडो प्रकार

यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात ‘याची देही, याची डोळा’ बघता येणार आहेत.

6 2

दोन वर्षांच्या खंडा नंतर

कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. याच मेहनतीतून पाना- फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृतींसह विविध प्रकारच्या प्रतिकृती या प्रदर्शनास अनुभवायला मिळणार आहेत, अशी माहिती या निमित्ताने जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

7

मध्यवर्ती संकल्पना

वर्ष २०१६ पासून एका मध्यवर्ती संकल्पनेवर उद्यान प्रदर्शनी आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत *वर्ष २०२०* मध्ये मुंबईच्या मानबिंदूंच्या आकर्षक प्रतिकृतींचा समावेश उद्यान प्रदर्शनात करण्यात आला होता. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रतीक असणारा फिल्म शूटिंग कॅमेरा यासारख्या प्रतिकृती पानाफुलांपासून साकारण्यात आल्या होत्या.

8 1

‘संगीत आणि वाद्य’ संकल्पना

*वर्ष २०१९* मध्ये ‘संगीत आणि वाद्य’ या मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित उद्यान प्रदर्शनात पाना-फुलांपासून तयार केलेली सनई, बासरी, गिटार, तबला, वीणा, सितार, संवादिनी (हामोर्नियम) इत्यादी वाद्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या.

9 1

सन २०१८च्या प्रदर्शनात ‘जलचर’ संकल्पना

‘सन २०१८’च्या प्रदर्शनात ‘जलचर’ या मध्यवर्ती संकल्पनवर आधारित जलपरी, डॉल्फीन, स्टारफीश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा इत्यादींच्या प्रतिकृती होत्या.

स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’

‘वर्ष २०१७’मध्ये मिकीमाऊस, डोरेमॉन, डोनाल्ड डक यासारख्या लहान मुलांच्या आवडत्या ‘कार्टुन्स’च्या प्रतिकृती प्रदर्शित करुन मध्यवर्ती संकल्पना साकारण्यात आली होती. तर मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित पहिल्या उद्यान प्रदर्शनात ‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’ ही मध्यवर्ती संकल्पना होती.

मागील दोन वर्ष प्रदर्शन रद्द

*वर्ष २०१६* मध्ये आयोजित या उद्यान प्रदर्शनात पाना फुलांचा वापर करुन तयार केलेल्या स्वच्छता विषयक साहित्य व वाहनांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सन २०२१ आणि २०२२ मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले नव्हते.

दीड लाख नागरिकांनी दिली भेट

महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाला भेट देणा-या अभ्यागतांची संख्या देखील दरवर्षी नवनवे उच्चांक गाठत आहे. वर्ष २०१६ मध्ये सुमारे ५० हजार मुंबईकरांनी वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेट दिली होती. वर्ष २०१७ मध्ये ७५ हजारांपेक्षा अधिकांनी; तर वर्ष २०१८, तर वर्ष २०१९ आणि २०२० मध्ये तब्बल दीड लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती.

फुले, फळे व भाज्या” प्रदर्शनाचे हे २६ वे वर्ष

‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५’ मधील तरतूदींनुसार दिनांक १८ ते २२ जानेवारी १९९६ दरम्यान पहिले उद्यान प्रदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दरवर्षी साधारणपणे हिवाळ्यात हे प्रदर्शन वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येते. सन १९९६ पासून दरवर्षी आयोजित होणा-या “फुले, फळे व भाज्या” प्रदर्शनाचे हे २६ वे अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

प्रदर्शन विनामूल्य

यंदाच्या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवार ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते सायंकाळी ८ पर्यंत; तर दि. ०४ फेब्रुवारी व दि. ०५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

‘जी २०’ सदस्य देशातील झाडे भाज्या व फुलेही प्रदर्शनात

या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधी देखील मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. तसेच ‘जी २०’ परिषदेचे औचित्य लक्षात घेऊन ‘जी २०’ सदस्य देशातील झाडे भाज्या व फुले देखील या प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेत.

उद्यानविद्या विषयक विविध कार्यशाळांचे आयोजन

या प्रदर्शनासोबतच आयोजित होणा-या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना असणार आहे. तरी या प्रदर्शनी सोबतच मुंबईकर नागरिकांसाठी उद्यानविद्या विषयक विविध कार्यशाळांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे, असेही परदेशी यांनी कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.