नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत पर्यटकांची विक्रमी गर्दी; १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे उत्पन्न झाले प्राप्त

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला रविवारी १ जानेवारी अर्थात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३२ हजार ८२० इतक्या पर्यटकांनी भेट दिली.

( हेही वाचा : मुंबई-गोवा ‘शिवशाही’ सेवा बंद! ९ दिवसात सव्वा चार लाखांहून अधिक उत्पन्न)

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. कोविड कालावधीत संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले हे प्राणिसंग्रहालय कोविड निर्बंध संपल्यानंतर पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे. शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत या उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारची संधी साधून पर्यटकांनी मोठ्या संख्येने या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली.

यापूर्वी दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एकाच दिवशी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्या दिवशी सुमारे ११ लाख १२ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. हा विक्रम आज (दिनांक १ जानेवारी २०२३) मोडीत निघाला आहे. एकाच दिवसात तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने २७ हजार २६२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ९ लाख ६० हजार ७२५ रुपये उत्पन्न मिळाले. तर ऑनलाईन नोंदणी करून ५ हजार ५५८ जणांनी भेट दिली. यातून ४ लाख १८ हजार रुपयांची तिजोरीत भर पडली.

विशेष म्हणजे, विक्रमी संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनवेळा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून देखील अतिशय योग्य रीतीने सर्वांना पक्षी, प्राणी आणि उद्यान पाहता येईल, याची प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली. असे असले तरी, सर्वांना सामावून घेणे शक्य नसल्याने मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ४.४५ वाजता बंद करण्यात आल्यानंतर नाईलाजाने काही पर्यटकांना माघारी जावे लागले, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here