वेसावे (वर्सोवा) येथील किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (सीआरझेड) अनधिकृत बांधकामाविरोधात मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जून २०२४ पासून हाती घेतलेली मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. या भागातील आणखी दोन इमारतींवर बुधवारी (१० जुलै २०२४) रोजी बुलडोझर चालवण्यात आला आहे. (Versova Illegal Construction)
वर्सोव्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) उद्भवलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार आणि के विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात येत आहे. (Versova Illegal Construction)
(हेही वाचा – Parliament Session : आता पालकांची जबाबदारी फक्त मुलांचीच नाही; जावई, सून, नातवंडांचीही असणार; केंद्राचे नवे विधेयक)
मागील ३ जून २०२४ पासून वेसावे गाव (शिवगल्ली) भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू असून आतापर्यंत या भागातील सात इमारतींवर कारवाई करून बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळमजला आणि तीन मजली, चार मजली तसेच पाच मजली अशा स्वरुपाच्या इमारतींचा समावेश आहे. बुधवारी ही तोडक करताना मुंबई महानगरपालिकेचे ३९ अधिकारी, ३० कामगार अशा मनुष्यबळासह एक पोकलेन संयंत्र, दोन जेसीबी, पाच हँडब्रेकर आदी संसाधनांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. या भागातील अजून ७ ते ८ इमारतींवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असे असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. (Versova Illegal Construction)
Join Our WhatsApp Community