अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री (Seema Deo) सीमा देव यांचे निधन झाले आहे. आज म्हणजेच गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते.
सीमा देव (Seema Deo) यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून त्या वयोमानानुसार आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीम त्यांचा मुलगा अभिनव देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत.
(हेही वाचा – Board Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता होणार वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा)
सीमा देव (Seema Deo) यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांची संख्या ऐंशीच्या घरात आहे. १९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी परंतु संस्मरणीय आहे.
‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर’ हे त्यांचं (Seema Deo) मोलकरीण चित्रपटातील गाणं प्रचंड गाजलं होतं. आनंद सिनेमातही रमेश देव आणि सीमा देव या दोघांनी काम केलं होतं. या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीतली एक उत्तम जोडी म्हणून ओळखली जात होती.
मला त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या – अशोक सराफ
एक देखणी सुंदर नटी, अभिनयाची जण असलेली आणि सुशील अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली. त्यांची (Seema Deo) आणि रमेश देव यांची जोडी अभिनय क्षेत्रात सर्वांत सुंदर जोडी म्हणून मनाली जाते. मला त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. एक चांगली अभिनेत्री आपल्यातून गेल्याच दुःख आहे. सीमा देव ह्या त्या काळातील सर्वोत्तम नटी होत्या. त्यांनी नंतर रमेश देव यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम केल्याचं दिसलं नाही. आम्ही एकत्र असं फार कमी काम केलं. त्यांचं लग्नाआधीचं आडनाव देखील सराफ होतं.
जुने जाणते लोक निघून गेल्यावर पोकळी ही जाणवतेच – रोहिणी हट्टंगडी
सीमा देव (Seema Deo) यांचं जाणं कायम बोचत राहील. अभिनयात त्यांनी इतकं काही करून ठेवलं आहे की ते आम्हाला आयुष्यभर पुरेल. जुने जाणते लोक निघून गेल्यावर पोकळी ही जाणवतेच. ज्यांच्यामुळे आम्ही आता इथे आहोत त्यांचं असं जाणं फार मनाला लागतं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community