परळमधील बैल घोडानंतर मुंबईत आणखी एक पशुवैद्यकीय रुग्णालय बांधले जाणार आहे. महालक्ष्मी येथील महापालिकेच्या भूखंडावर हे पशु वैद्यकीय रुग्णालय उभे राहणार असून ‘टाटा’ च्या मदतीने ३०० ते ४०० खाटांचे हे रुग्णालय असेल. याचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून कागदावरच अडकलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे. त्यामुळे जानेवारी २०२३पर्यंत हे रुग्णालय सुरु होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
बांधा, वापरा, आणि हस्तांतरित करा, या तत्वावर रुग्णालयाची उभारणी!
मुंबई महापालिकेच्या महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या मागील बाजूस ३०४५ .४० चौ मीटरचा भूखंड आहे. या भूखंडावर हे रुग्णालय बांधले जाणार आहे. सध्या या भूखंडावर श्वान नियंत्रण कार्यालय आहे. वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज या संस्थेच्यावतीने हे केंद्र चालवले जात आहे. त्यामुळे याठिकाणी सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडी टिटी) या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर या रुग्णालयाची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेला ३० वर्षांच्या कालावधीकरिता हे रुग्णालय चालविण्यास दिले जाणार आहे. बांधा, वापरा, आणि हस्तांतरित करा, या तत्वावर या जागेवर ही संस्था पशु वैद्यकीय रुग्णालयाची उभारणी करणार आहे. महापालिकेने मान्यता दिल्यानंतरही पहिल्या दोन ते अडीच वर्षांत कोणत्याही प्रकारे हालचाल न झालेल्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे काम कोविडअभावी होवू शकले नाही. परंतु याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या रुग्णालय उभारणीच्या दृष्टीकोनातून पायलिंगचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे पुढील १८ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल. जानेवारी २०२३मध्ये हे रुग्णालय सुरु झालेले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या रुग्णालयात एकाच वेळी ३०० छोट्या प्राण्यांना अर्थात कुत्रे, मांजर इत्यादींना दाखल करण्याची सुविधा असणार आहे.
(हेही वाचा : दुसऱ्या लाटेत उसंती मिळताच कोविड सेंटरची डागडुजी सुरु!)
काय असणार हॉस्पिटलमध्ये?
- ३०० लहान जनावरांसाठी ओपीडी
- शल्य चिकित्सा कक्ष अर्थात सर्जिकल वॉर्ड
- अपघात आणि आपत्कालीन कक्ष
- आयसीयु आणि आयसीयू सुविधा
- त्वचा आजार कक्ष
- ओपीडी मेडिसिन
- एम आर आय
- डायलिसीस सेंटर
- सोनोग्राफी
- रक्तपेढी