चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यामुळे संघर्ष वाढत असताना रविवारी, 15 जानेवारी रोजी भद्रावती येथील शेतात वाघाचा मृतदेह आढळला. वाघाच्या मृतदेहाची प्रथमदर्शनी पाहणी केली असता विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या पंधरवड्यात वेगवेगळ्या कारणास्तव विदर्भात सहा वाघांचा मृ्त्यू झाला आहे. विदर्भातील वाढती संघर्षमय परिस्थिती पाहता वाघांच्या संवर्धनासाठी मोठे आव्हान उभे राहत असल्याची प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासकांनी दिली.
वन गुन्हा नोंदवला
तीन दिवसांपूर्वी नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील नदीत वाघाचा मृतदेह आढळला. ही घटना ताजी असतानाच दुस-या दिवशी व्याघ्रप्रकल्पात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव विकण्या-या तीन आरोपींना वनाधिका-यांनी पकडले. रविवारी चंद्रपूर रेल्वेमार्गाजवळील पंढरी पाटेकर यांच्या शेतात वाघाचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी पाहणी केली. पूर्ण वाढ झालेल्या वाघीणीच्या मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या शरीरावर सर्व अवयव दिसून आले. या प्रकरणी चौकशी केली असता शेतात विजेची तार जोडल्याचे आरोपी पुनेश पाटेकर यांनी कबूल केले. या प्रकरणी पुनेश पाटेकर यांच्यावर वनाधिका-यांनी वन गुन्हा नोंदवला असून, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Join Our WhatsApp Community