कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतरचा (Kurla Bus Accident) एक संतापजनक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन ते तीन इसम मदत करण्याच्या निमित्ताने अपघातात मृत झालेल्या फातिमा कनीज अन्सारी (५५) या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली असून कुर्ला पोलिसांनी याची दखल घेतली नाही.
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसच्या अपघातात (Kurla Bus Accident) ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले होते, या अपघातानंतर प्रत्येक जण मदतीसाठी धावत होता, अनेक जण जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम करीत होते, त्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अपघात झाला त्याच ठिकाणी आंबेडकर नगर जवळ असलेल्या देसाई रुग्णालयात काम करणाऱ्या फातिमा अन्सारी यांचा या अपघातात मृत्यू झाला, फातिमा यांचा मृतदेह आर्टिका मोटारीच्या चाकाखाली अडकला होता, त्या दरम्यान एक हेल्मेटधारी व्यक्तीसह तिघेजण मृत फातिमा यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्यात व्यस्त होते, हा प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला आहे.
(हेही वाचा CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्ली दौरा; महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार)
दरम्यान फातिमा कनीज अन्सारीच्या कुटुंबीयांनी मंगळवारी कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात जाऊन फातिमा यांचे सोन्याचे कानातले गायब असल्याचा आरोप केला होता, त्यांनी मृतदेह राजावाडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता तिकडे चौकशी करा, असे सांगण्यात आले होते. फातिमा कनीज अन्सारी (५५ ) यांचा जावई आबिद शेख याने या भीषण अपघाताचे वर्णन केले आणि त्यामुळे तिचा जीव कसा गेला याबाबत सांगितले. “माझ्या सासूबाई अंजुम इस्लाम शाळेसमोरील देसाई हॉस्पिटलमध्ये आया (अटेंडंट) म्हणून काम करत होत्या. त्या रात्री ८ वाजता त्यांच्या कामाच्या ठिकाणी घरून निघायच्या, परंतु सोमवारी त्या रात्री ९ च्या सुमारास निघून गेल्या. “ती देसाई हॉस्पिटलच्या बाहेर उभी होती तेव्हा अचानक एका बसने तिला धडक दिली. ती एक वाहन आणि बेस्ट बसमध्ये अडकली होती. आम्हाला तिच्या मोबाईलवरून कॉल आला की कोणीतरी आम्हाला ताबडतोब भाभा हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले,” शेख म्हणाले. फातिमा कनीज अन्सारी यांना रुग्णालयात आणले असता तिचे सोन्याचे कानातले शाबूत होते, असे त्यांनी सांगितले. (Kurla Bus Accident)
“तथापि, त्यानंतर जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा हा मृतदेह रुग्णालयात पाहिला तेव्हा तिचे कानातले गायब होते. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच रुग्णालयाच्या डीनला याबाबत सांगितले, पण त्यांनी आम्हाला पंचनामा होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. कुर्ला (पश्चिम) येथील रहिवासी फातिमा कनीज अन्सारी यांना भाभा रुग्णालयात मृत आणण्यात आले. भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पद्मश्री अहिरे म्हणाल्या, “ फातिमा अन्सारीच्या कुटुंबीयांनी (तिच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची) घटना आमच्या निदर्शनास आणून दिली. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी आम्ही रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहोत. दरम्यान बुधवारी फातिमा यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तिच्या हातातील बांगड्या काढणारे कोण आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community