सध्याच्या पिढीमध्ये आई-वडिलांचा सन्मान करणे, उतारवयात त्यांची सेवा करणे, त्यांचा संभाळ करणे हा भाग होत नाही. पितृऋणापासून ही पिढी कायम दूर पळते, या अत्यंत महत्वाच्या सामाजिक समस्येवर रुईया महाविद्यालयाच्या (Ruia College) ‘विद्यार्थ्यांचा राजा’ या गणेशोत्सव मंडळाने प्रकाश टाकला आहे. या विषयावर आधारित ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ हा देखावा साकारण्यात आला आहे.
रुईया नाक्याचा गणपती हा विद्यार्थ्यांचा राजा अशा नावाने हा ओळखला जातो. 1978 मध्ये या गणपतीची स्थापना रुईया नाका (Ruia College) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली असून यंदा 46वे वर्ष साजरा करीत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव विद्यार्थ्यांचा राजा असे नावलौकिकास असलेले व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा असे वैचारिक दृष्टिकोन असणारे हे मंडळ आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव रुईयाचे विद्यार्थी सर्व दहा दिवस आनंदाने साजरा करतात.
आई-वडील आणि मुले यांच्यातील नातेसंबंध आणि सध्याच्या परिस्थितीत या नात्याचे भावनिक, मानसिक कंगोरे मांडण्याचा प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. देखाव्यामध्ये श्रींचा गाभारा उभारला असून त्यांचा बाजूला माता व पित्याला स्थान दिले आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना उच्च स्थान दिले आहे. मातृ-पितृ भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, हा धडा साक्षात गणरायाने त्याच्या माता-पित्याला प्रदक्षिणा करून भक्तांना घालून दिला आहे. आयुष्यभर आपल्या मुलाचे संगोपन करणारे, त्याला नि:स्वार्थ मनाने मार्गदर्शन करणारे आई-वडील हे मुलाच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गुरू आहेत. त्यांची सेवा, आराधना केल्यानेच आपल्याला यशप्राप्ती होते. पण, सध्याच्या काळात आई-वडिलांचा त्यांच्या म्हातारपणी सांभाळ करणे या कर्तव्यापासून तरुणाई दूर पळत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. त्यासाठी हा देखावा प्रबोधनपर विषयावर आधारित आहे. ज्याची सध्या मुंबईकरांना भुरळ पडली आहे.
Join Our WhatsApp Community