विहार तलावही भरला, मुंबईकरांना पाणी तुंबण्याची भीती

तलाव भरल्याने आता मिठी नदीची पातळी वाढत जाईल, परिणामी याचा धोका मुंबईला जाणवू शकतो.

123

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तुळशी पाठोपाठ विहार तलावही रविवारी सकाळी भरुन वाहू लागला. या तलावातून  मुंबईकरांना एकूण २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर(२ हजार ७६९ कोटी लिटर) पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हा तलाव भरल्याने आता मुंबईला अधिक धोका निर्माण झाला असून, या तलावातील पाणी मिठी नदीला येऊन मिळत असल्याने आता उपनगरातील वांद्रे, कुर्ला आदी भागात मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढून आसपासच्या परिसरात पाणी साचण्याची अधिक भीती व्यक्त केली जात आहे.

विहार आणि तुळसी या तलावांमधील पाणीसाठा हा केवळ मुंबईला पुरवल्या जाणाऱ्या एकूण साठ्याच्या ७ टक्के एवढाच आहे. हे दोन्ही तलाव भरल्याने मुंबईकरांची तहान भागू शकणारी नाही. त्यासाठी भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा ही धरणे भरणे आवश्यक आहे. दरवर्षी हे तलाव लवकर भरतात, आता लवकरच मोडक सागर आणि तानसा भरले जातील.

विहार तलावातून होतो इतका पाणीपुरवठा

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून, यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लिटर (९ कोटी लिटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

(हेही वाचाः भांडुप संकुलात तुंबले पाणी, मुंबईकरांच्या गेले नळाचे पाणी)

मुंबईला धोका

मुंबईतील दोन तलावांपैकी महापालिकेचा ‘विहार तलाव’ मागील वर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०च्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. तर यावर्षी १५ दिवस आधीच तलाव भरुन वाहू लागला आहे. रविवारी सकाळी ९ वाजता ता वाहू लागला. २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव ३१ जुलै २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. तलाव भरल्याने आता मिठी नदीची पातळी वाढत जाईल, परिणामी याचा धोका मुंबईला जाणवू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

विहार तलावाचा इतिहास

या तलावाचे बांधकाम १८५९ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून, तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर एवढा असतो. तलाव पूर्ण भरुन वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.

(हेही वाचाः मुंबईत तलाव भरण्याचा श्रीगणेशा झाला… ‘हे’ तलाव भरले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.