Vijay Surya Mandir : मध्‍यप्रदेशातील प्राचीन सूर्यमंदिराला पुरातत्‍व विभागाने ठरवले मशीद; हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मागणी

195
Vijay Surya Mandir : मध्‍यप्रदेशातील प्राचीन सूर्यमंदिराला पुरातत्‍व विभागाने ठरवले मशीद; हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली 'ही' मागणी
Vijay Surya Mandir : मध्‍यप्रदेशातील प्राचीन सूर्यमंदिराला पुरातत्‍व विभागाने ठरवले मशीद; हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली 'ही' मागणी

विदिशा (मध्‍यप्रदेश, Madhya Pradesh) येथील प्राचीन विजय सूर्य मंदिर ‘मंदिर नसून मशीद आहे’ असे पत्र भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाने (Archaeological Survey of India) जिल्‍हाधिकार्‍यांना पाठवल्‍यावरून येथे वाद निर्माण झाला आहे. सध्‍या हे मंदिर पुरातत्‍व विभागाच्‍याच नियंत्रणात आहे. अनेक दशकांपासून हिंदु भाविक नागपंचमीला या मंदिराच्‍या परिसरात धार्मिक विधी करत आहेत. यावर्षी काही हिंदु संघटनांनी ९ ऑगस्‍टला म्‍हणजे नागपंचमीला येथील आवारात प्रवेश करून पूजा करण्‍याची प्रशासनाकडे अनुमती मागितली होती. लोकांच्‍या मागणीचे पत्र जिल्‍हाधिकारी बुद्धेश वैश्‍य यांनी पुरातत्‍व विभागाला पाठवले होते. (Vijay Surya Mandir)

(हेही वाचा – BMC : मुंबईतील जाहिरातींचे प्रारूप धोरण प्रसिद्ध, जनतेकडून जाणून घेणार हरकती – सूचना)

या पत्रावर विभागाने वर्ष १९५१ च्‍या राजपत्राचा (गॅझेटचा) हवाला देत दिलेल्‍या उत्तरात म्‍हटले की, ‘पुरातत्‍व विभागाने या जागेचे वर्गीकरण ‘बिजमंडल मशीद’ म्‍हणून केले.’ या उत्तरानंतर जिल्‍हाधिकार्‍यांनी पूजेला अनुमती नाकारल्‍याने हिंदु संघटनांमध्‍ये रोष पसरला. जिल्‍हाधिकारी बुद्धेश वैश्‍य यांनी स्‍थानिक माध्‍यमांना सांगितले की, पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाच्‍या नियमानुसार सर्व काही केले जाईल.

पुरातत्‍व विभागाच्‍या या दाव्‍याला हिंदू संघटना विरोध करत आहेत. संघटनांचे म्‍हणणे आहे की, प्राचीन काळापासून सूर्य मंदिर हिंदूंचे श्रद्धास्‍थान आहे. आमदार टंडन यांनी ‘मंदिराची मालकी’ सिद्ध करण्‍यासाठी सर्वेक्षण करण्‍याची मागणी केली आहे. आमदार मुकेश टंडन विधानसभेत हे सूत्र उपस्‍थित करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटण्‍यासाठी देहलीला जाण्‍यासाठी प्रयत्न करत आहेत. एप्रिल १९९२ मध्‍ये अशीच परिस्‍थिती निर्माण झाली होती. तेव्‍हा पुरातत्‍व विभाग आणि जिल्‍हाधिकारी यांच्‍यात यशस्‍वी वाटाघाटी झाल्‍या, त्‍यानंतर ११ लोकांच्‍या पथकाला मंदिरात पूजा करण्‍याची अनुमती देण्‍यात आली.

विजय सूर्य मंदिराचा इतिहास

विजयसूर्य मंदिर भोपाळपासून सुमारे ६० कि.मी. आणि सांची स्‍तूपापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे. पुरातत्‍व विभागाच्‍या भोपाळ विभागाच्‍या संकेतस्‍थळावर म्‍हटले आहे की, बिजमंडल मशीद एका हिंदु मंदिराच्‍या अवशेषांवर बांधली गेली होती आणि एका खांबावर सापडलेल्‍या शिलालेखांमध्‍ये, ‘ते देवी चार्चिकाचे मंदिर होते’, असे म्‍हटले आहे. असे मानले जाते की, हे मंदिर ११ व्‍या किंवा १२ व्‍या शतकात सूर्यदेवाच्‍या सन्‍मानार्थ बांधले गेले होते. मोगल राजवटीत विशेषत: औरंगजेबाच्‍या कारकीर्दीत मंदिराची बरीच हानी झाली होती. त्‍यानंतर १७ व्‍या शतकात ‘मशीद’ म्‍हणून त्‍याची पुनर्बांधणी करण्‍यात आली; मात्र मराठा राजवटीत ही मशीद दुसर्‍या ठिकाणी हालवण्‍यात आल्‍याने ती जागा मोडकळीस आल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे.

वर्ष १९३४ मध्‍ये मंदिराच्‍या अवशेषांचा शोध लागल्‍याने हिंदु महासभेच्‍या नेतृत्‍वाखाली मंदिराच्‍या संवर्धनासाठी चळवळ चालू झाली. याचा महत्त्वपूर्ण राजकीय परिणाम झाला. येथे हिंदु महासभेचे उमेदवार स्‍थानिक निवडणुकीत निवडून आले. तेव्‍हापासून मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला पूजेसाठी उघडले जाते. वर्ष १९६५ मध्‍ये धार्मिक तणाव दूर करण्‍यासाठी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी येथे मुसलमानांसाठी स्‍वतंत्र ईदगाह (नमाजपठण करण्‍याची जागा) स्‍थापन केला. हा वाद पुन्‍हा भडकल्‍यानंतर हिंदु संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बिजमंडल विजय मंदिर’ नियमित पूजेसाठी पुन्‍हा चालू करण्‍याचे आवाहन केले आहे. (Vijay Surya Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.