गणेशोत्सवामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये विसर्जनाच्या वेळी घरगुती गणेशमूर्तींसह पाच जण, तर सार्वजनिक उत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींसह दहा भाविकांना सहभागी होण्याची अट घालण्यात आली आहे. परंतु शनिवारी झालेल्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या वेळी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या नियमांना हरताळ फासला गेला. प्रत्येक गणपतीसोबत निश्चित केलेल्या भाविकांच्या संख्येपेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या आणि त्यांना कुठेही पोलिस तथा महापालिकेच्यावतीने हटकले जात नव्हते.ॉ
(हेही वाचाः कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन)
काय आहेत नियम?
मागील वर्षी कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मागील वर्षी कोविडच्या भीतीने नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांकडून यंदा मात्र महापालिकेने जारी केलल्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जी नियमावली जाहीर केली आहे, त्यामध्ये घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपात नसावे आणि जास्तीत-जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा आणि सहभागी झालेल्या व्यक्तींच्या लसीकरणाचे दोन डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत, अशाप्रकारची ही नियमावली होती. तर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपात नसावे आणि जास्तीत-जास्त १० व्यक्तींचा समूह असावा असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचाः यंदा दीड दिवसांमध्ये २० हजार बाप्पांना निरोप नाही)
कोविड नियमावली कागदावरच
शनिवारी झालेल्या दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या सोहळ्यात खासगी वाहनांमधून येणाऱ्या भाविकांकडून योग्यप्रकारे नियमांचे पालन होताना दिसत होते. परंतु अनेक भाविक हे घरच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सहभागी झाले होते. घरगुती गणपतीला निरोप देताना पाचपेक्षा अधिक व्यक्ती तर सार्वजनिक गणपतीसोबत दहा पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झालेल्या दिसून येत होत्या. विशेष म्हणजे या गणपतीसोबत असलेल्या या व्यक्तींचे दोन डोस पूर्ण झाले किंवा नाही याची तपासणीही होत नव्हती की त्यांना नियमांपेक्षा जास्त व्यक्ती असल्याने पोलिसांकडून किंवा महापालिकेच्या पथकांकडून रोखले जात नव्हते. त्यामुळे कोविडची गणेशोत्सवासाठी असलेली ही नियमावली कागदावरच असल्याचे विसर्जनाच्या पहिल्याच दिवशी दिसून आले आहे.
(हेही वाचाः सार्वजनिक उत्सव मंडळांमधील उत्साह मावळतोय का?)
Join Our WhatsApp Community