मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक बनू लागला आहे. याला कारणे अनेक आहेत. सध्या महामार्गावर होणारे अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने होतात, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचाही बळी याच कारणामुळे गेला, अशी प्राथमिक चर्चा आहे. रविवारी, १४ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता विनायक मेटेंच्या एसयुव्ही कारला पनवेलनजीक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. यावेळी मेटे यांच्या गाडीत तीन जण होते, त्यातील मेटे यांचा मृत्यू झाला, चालकाच्या बाजूला पोलीस बसला होता, तो गंभीर जखमी झाला आहे, तर चालक मात्र सुरक्षित आहे. पोलिसांनी तत्काळ चालकाला ताब्यात घेतले. चालकाने माहिती दिल्यानुसार प्राथमिक तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये मेटे यांचा चालक लेन चेंज करत होता, तितक्यातच पुढे जात असलेला ट्रक देखील लेन चेंज करत होता, यामुळे मेटे यांच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार ट्रकवर आदळली, असे समोर आले आहे.
लेन कटचा परिणाम
या महामार्गावर सहा लेन आहेत. त्यातील जड वाहनासाठी, बस गाड्या, छोट्या गाड्या यांच्यासाठी स्वतंत्र लेन आहेत. या सर्व वाहनांनी त्या त्या लेनमधून गाड्या चालवणे हा नियम आहे. असे असतानाही सध्या या महामार्गावर वाहन चालक लेन कट नियमाचे सर्रास उल्लंघन करू लागले आहेत. विशेष म्हणजे जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक जेव्हा चुकीच्या पद्धतीने लेन कट करतात तेव्हा होणारे अपघात जीवघेणे ठरतात. त्यामुळे मेटे यांच्या अपघातात या वाहतूक नियमाच्या उल्लंघनाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. मालवाहतूक करणारी वाहने कोणत्याही लेनमधून घुसत असतात. तिसऱ्या लेनमध्ये ट्रक चालकांना वाहन चालविण्याची परवानगी असते. परंतू हे ट्रकचालक दुसऱ्या आणि पहिल्या लेनमधून अवजड वाहने चालवितात. यामुळे हे अपघात होत आहेत.
(हेही वाचा विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!)
पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह
महामार्गाची निर्मिती झाली तेव्हा ठराविक अंतरावर पोलिसांचे कायम पेट्रोलिंग सुरु असायचे, परंतु दुर्दैवाने आता तितके गांभीर्याने पेट्रोलिंग होताना दिसत नाही. जेव्हा मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला तेव्हा जर या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु असते तर अपघातग्रस्त व्यक्तीच्या जीवनात १ तास हा गोल्डन अव्हर मानला जातो, त्या दरम्यान मेटे यांच्यावर उपचार करणे शक्य झाले असते.
- २००२ साली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरु
- १४,९३० अपघात २००२ ते २०२१ या कालवधीत झाले
- १,९१८ जणांचा अपघाती मृत्यू २००२ ते २०२१ मध्ये झाला
- ३ तासांवरून प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवर आला