नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधातील आंदोलनाला आज दिल्लीत हिंसक वळण लागले. सकाळी सात वाजता आंदोलनकर्त्यांनी एक ट्रॅक्टरलाच जाळून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.
सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले होते. त्यानंतर आता मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना समोर आली आहे.
ट्रॅक्टरला आग लावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनजोत सिंग, रमनदीपसिंग सिंधू, राहुल, साहिब आणि सुमित अअशा ५ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले सर्व तरुण हे पंजाब युवा काँग्रेसचे नेते असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इंडिया गेट जवळून एक इनोव्हा कारदेखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community