मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे पहायला मिळत आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हाच प्रश्न कित्येकदा मुंबईकराला पडतो. काही ठिकाणी खड्डे म्हणजे तर ‘मौत का कुँआ’ झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडीच्या समस्यांना दररोज मुंबईकराला सामोरं जावं लागतं. पण तरीही शिवसेनेची सत्ता असलेले मुंबई महापालिका प्रशासन मात्र आपण खड्डे बुजवल्याचा टेंभा मिरवत आहे.
पण हा दावा खोटा ठरवणारा मुंबईच्या रस्त्यांवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क ट्रॅफिक पोलिस रस्त्यांवरील खड्डे बुजवून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करताना दिसत आहेत. आहे की नाही कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? पण महापालिका प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव कधी येणार? अजून किती वर्ष महापालिका मुंबईकरांना खड्ड्यातच घालणार? असा संतप्त सवाल त्रस्त मुंबईकर विचारत आहेत.
(हेही वाचाः चार वर्षांत ७ हजार कोटींची रस्त्यांची कामे, तरीही खड्डे आहेतच!)
काय आहे व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये मुंबईतील एका रहदारीच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरव्ही सिग्नलला उभे राहून शिटी वाजवत वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कारवाई करणारे ट्रॅफिक पोलिस चक्क खड्डे बुजवण्याचे काम करुन मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कामगिरीला सलाम करत, महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.
कोट्यवधींचा खर्च तरीही मुंबईकर खड्ड्यातच
रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा मागवून महापालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट दोन वर्षांचे आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजवण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील २४ विभागीय कार्यालयांसाठी प्रति वर्षी ४८ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तरीही मुंबईकरांचे पाय मात्र आजही खड्ड्यांतच अडकले आहेत.
(हेही वाचाः 31 हजार खड्डे बुजवले, तरी मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच अडकले)
Join Our WhatsApp Community