विरारच्या वि.वा.महाविद्यालयाने पुन्हा एकदा एकांकिका स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका क्षेत्रात मानाची समजल्या जाणाऱ्या इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन(इप्टा) हिंदी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत वि.वा.महाविद्यालयाने द्वितीय पारितोषिक पटकावत इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच वि.वा.महाविद्यालयाने इप्टा एकांकिका स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहे.
वि.वा.महाविद्यालयाची कामगिरी
49व्या इप्टा स्पर्धेत वि.वा.महाविद्यालयाची सेल ऑफ सुसाईड(SOS) ही एकांकिका 27 महाविद्यालयांमधून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी 21 सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यगृह येथे पार पडली. यामध्ये वि.वा.महाविद्यालयाने द्वितीय पारितोषिक पटकावत इप्टा स्पर्धेचा मानाचा असा मनमोहन क्रिष्णा करंडक पटकावला आहे. तसेच या एकांकिकेत मुख्य भूमिका साकारणा-या स्नेहा मुळीक हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा शौकत कैफी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे बक्षिस सुद्धा वि.वा.महाविद्यालयाच्या संघाने पटकावले आहे. अंतिम सहा एकांकिकांमधून वि.वा.महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
(हेही वाचाः Calling App साठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार? असे आहे विधेयक)
महेश सापणे आणि शार्दुल आपटे यांनी या एकांकिकेचे दिग्दर्शन केले आहे. वि.वा. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या ओमकार येंडे याने एकांकिकेचे पार्श्वसंगीत केले आहे, तर नेपथ्याची जबाबदारी मानसी जाधव, रूपक मराठे आणि जितू कदम यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. एकांकिकेच्या विषयाची धीरगंभीरता महेश सापणे यांनी केलेल्या प्रकाशयोजनेमुळे अधिक अधोरेखित होते.
कलाकारांचे कौतुक
सिने-नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक मकरंद देशपांडे,प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण केले. दरम्यान, या विजयाबाबत वि.वा.महाविद्यालयाचे विश्वस्त,मुख्याध्यापक,सर्व प्राचार्य आणि शिक्षकवर्गाने सर्व विद्यार्थी कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
Join Our WhatsApp Community