कालपर्यंत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, सर्व काही उपभोगले आणि शेवटी जेव्हा कळले प्रेयसीला गंभीर आजार जडला आहे. त्यामुळे हळूहळू त्याचा तिच्यातील इंटरेस्ट कमी होऊ लागतो, पण म्हणतात ना प्रेम आंधळे असते, प्रेयसीचे अजूनही त्याच्यावर प्रेम असते, म्हणून ती लग्न करण्यासाठी आर्जव करू लागते, पण तो प्रत्येक वेळी कुठले ना कुठले कारण देत टाळत असतो. अखेरीस तो रोजचा होणारा त्रास कायमचा संपवूया, असा विचार करतो आणि तिच्या शरीरात इंजेक्शन भरतो. थंड डोक्याने खून करणारा तो वॉर्डबॉय पोलिसांच्या हाती लागणार नाही, अशा भ्रमात राहतो, मात्र नियतीचे फासे पडतात आणि अवघ्या २ दिवसांत तो ‘देवमाणूस’ गजाआड होतो.
…म्हणून प्रेयसीचा त्रास कायमचा संपवण्याचे ठरवतो!
हे प्रकरण आहे पनवेल येथील. पनवेल तालुक्यात राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणीचे पटेल रुग्णालयात काम करणाऱ्या चंद्रकांत गायकर या वॉर्डबॉय सोबत प्रेम जुळले होते. त्यांच्यामध्ये मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात त्या तरुणीला गंभीर आजार जडतो. हे जेव्हा चंद्रकांतला समजते, तेव्हा तो तिला टाळायला लागला. त्याने तिच्यासोबत लग्न करायचे नाही, असे ठरवले होते. मात्र ती प्रेयसी चंद्रकांतकडे सतत लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. सरतेशेवटी तिने लग्न कर नाहीतर गावात सर्वांना सांगेन, अशी धमकीच देते. त्यामुळे हा त्रास कायमचा संपवण्याचा चंद्रकांत निर्णय घेतो.
निर्जनस्थळी नेऊन केटामाईनचे ४ इंजेक्शन दिले!
त्यासाठी त्याने पटेल रुग्णालयाच्या साठ्यातून भुलीसाठी देण्यात येणाऱ्या केटामाईन या इंजेक्शनच्या ४ वायल्स आणि आयव्ही घेतल्या. त्यानंतर प्रेयसीला २९ मे रोजी पनवेल येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्जन स्थळी बोलावून घेतले. प्रेयसी त्याठिकाणी आल्यावर डॉक्टरांनी तुझ्या आजारावर हे इंजेक्शन दिले आहे, असे सांगत चंद्रकांतने तिला आयव्ही लावून त्यातून केटामाईनचे ४ इंजेक्शन दिले. काही वेळातच प्रेयसीचे अंग थंड पडल्यावर. आरोपी चंद्रकांत प्रेयसीकडील पिशवी आणि आयव्ही व अन्य सर्व पुरावे दूरवर फेकून दिले.
(हेही वाचा : कशी होते मान्सून वा-यांची निर्मिती? भारत आणि महाराष्ट्रात कसा पडतो प्रभाव?)
२ दिवसांत पोलिसांनी केली अटक!
पोलिसांना जेव्हा विमानतळाच्या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याचे समजले, तेव्हा पोलिस घटनास्थळी गेले. पनवेल शहर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून मृतदेहाची नोंद केली होती. मृताच्या शरीरावर कुठल्याही जखमा अथवा मारण्याच्या निशाण नसल्यामुळे अपघाती मृत्यू झाला असावा असेच पोलिसाना देखील वाटले होते. मात्र दुसऱ्या दिवशी एका रिक्षाचालकाला घटनास्थळापासून काही अंतरावर एक पिशवी सापडली. त्यातील वस्तूंवरून मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर या खुनाचा तपास सुरु करताच तरुणीच्या भावाकडून पोलिसांना प्रेम प्रकरणाबाबत समजले. पोलिसांनी तपासाची सूत्रे त्या दिशेने हलवल्या बरोबर पोलिस दोनच दिवसांत अर्थात ३१ मे रोजी आरोपी चंद्रकांत गायकरपर्यंत जावून पोहचले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच वॉर्डबॉय चंद्रकांत गायकर याने खुनाची कबुली दिली. न्यायालयाने आरोपीला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
केटामाईन इंजेक्शन म्हणजे काय?
केटामाईन इंजेक्शन हे खास करून रुग्नालयात शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णाला भूल देण्यासाठी वापरले जाते. रुग्णाची सर्व स्थिती पाहून तेवढ्याच प्रमाणात ते इंजेक्शन दिले जाते. परदेशात मात्र नशेसाठीही या इंजेक्शनचा वापर केला जातो.
Join Our WhatsApp Community