मुंबईत 17 मे रोजी लसीकरण बंद… काय आहे कारण?

मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

132

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 17 मे रोजी मुंबईत होणारे लसीकरण मुंबई महापालिकेतर्फे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेची माहिती

हवामान खात्याने नोंदवलेल्या तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद करण्यात आले असल्याचे, मुंबई महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना घरी राहण्याचे सुद्धा मुंबई महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 15 आणि 16 मे रोजी सुद्धा मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

(हेही वाचाः १७ ते २१ मे दरम्यान मुंबईत पाणीकपात)

५८० कोविडबाधितांचे एका रात्रीत स्थलांतर

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सज्ज आहे. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील भव्य कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून, एकूण ५८० कोविडबाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १५ मे रोजी रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील २४३ आणि मुलुंड कोविड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.