राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नांदगाव पेठ टोल नाका परिसरात चोरांची टोळी सक्रिय असून आजूबाजूच्या शेतीमधील तसेच रात्री महामार्गावर थांबा घेणाऱ्या उभ्या वाहनातील मौल्यवान साहित्यांवर चोरटे डल्ला मारत आहेत. मध्यरात्री चालत असलेल्या या प्रकारामध्ये नांदगाव पेठ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे टोल नाका असलेल्या परिसरात चोरीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असून पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.
मध्यरात्री चोर डल्ला मारतात
महामार्गावर असलेल्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर रात्रीच्या वेळी असंख्य मालवाहू वाहने रस्त्याच्या कडेला थांबतात. चालक आणि वाहकांना रात्रीची विश्रांती मिळावी म्हणून ते वाहने थांबवून आपल्याच वाहनात विसावा घेतात. मात्र नेमका चालक आणि वाचक ऐन साखरझोपेत असतांना मध्यरात्रीच्या वेळी ही चोरांची टोळी मालवाहू वाहनांमधील महागड्या साहित्याची चोरी करतात. सकाळी उठल्यावर चालक आणि वाचकांच्या लक्षात हा प्रकार येताच काहीजण पोलीस स्टेशन गाठतात तर काही वेळेच्या आणि पोलीस कार्यवाहीच्या विलंबामुळे घटणास्थावरून निघून जातात.
(हेही वाचा लोणावळ्याला फिरायला जाताय? मग हे वाचाच!)
अद्याप चोर गायब
या चोरट्यांचे लक्ष्य केवळ वाहनेच नाहीत, तर आजूबाजूच्या शेतातील धान्य, शेतीमधील महागडे उपकरणे देखील चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिस ठाण्याला दाखल आहेत. शेतकरी किंवा शेतीमधील सोकारी सुद्धा अशा घटनांमुळे आपला जीव मुठीत घेऊन शेताची रखवालदारी करत असल्याचे काहींनी सांगितले. परंतु आजपर्यंत हे चोरटे पोलिसांच्या हातात लागले नाही हे विशेष! पोलिसांनी या घटनांवर अंकुश घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे अन्यथा भविष्यात या प्रकारामुळे हत्या, बलात्कार सारखी घटना व्हायला देखील वेळ लागणार नाही.
Join Our WhatsApp Community