‘त्यांच्या’ घरातला कोरोना वेस्ट जातो सर्वांबरोबरच… मग का नाही पसरणार संसर्ग?

सध्या अनेक इमारती अथवा मजले सील करण्यात आल्याने त्यांच्याकडील कचरा हा स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. पण काही रुग्ण आपल्याला कोरोना झाल्याची माहिती लपवत असल्याने, त्यांची कल्पना इमारतीतील रहिवाशांना येत नाही.

मुंबईत सध्या आढळून येणााऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाणे हे ८० टक्क्यांच्या आसपास आहे. पण बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर ते घरीच राहून उपचार घेत असतात. अशा रुग्णांच्या घरातील कचरा हा सोसायटी व इमारतीतील इतर रहिवाशांच्या कचऱ्यासोबतच जात असल्याने मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. ज्या इमारती किंवा इमारतींचे मजले सील केले असतील, अशा इमारतींमधील कोविड रुग्णांच्या घरातील कचरा स्वतंत्र ठेऊन विल्हेवाटासाठी नेला जात असला, तरी अनेक बाधित रुग्णांची इमारतीच्या सोसायटी व अध्यक्षांनाच कल्पना नाही. त्यामुळे तेथील कचरा सरसकट उचलला जात असल्याने भीती वर्तवली जात आहे.

रुग्णांबाबत रहिवाशांना माहिती नाही

कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा अहवाल संशयित रुग्णाला प्राप्त होतो. पण अनेक संशयित रुग्ण हे आपल्याला कोरोना झाला हे सर्वांपासून लपवण्याचे काम करतात. काही जण घरीच राहून होम क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करतात. तर काही जण लक्षणेच नसल्याने आपल्याला काहीच झाले नाही या अविर्भावात बिनधास्त बाहेर फिरतात. त्यामुळे अनेकदा अशाप्रकारच्या पॉझिटिव्ह रुग्णांबाबत इमारतीतील इतर रहिवाशांना काहीच माहिती नसते. त्यामुळे त्या इमारतीतील कचरा स्वच्छ करणारा सफाई कामगार हा सर्वांसोबतच त्या बाधित रुग्णांच्याही घरातील कचरा एकत्रच जमा करतो आणि त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी तो सर्व कचरा गाडीत एकत्रच ओतून घेऊन जातात.

(हेही वाचाः कोरोना तुझा रंग ‘कोणता’? निगेटिव्ह असतानाही का दाखवले जाते ‘पॉझिटिव्ह’?)

संसर्ग वाढण्याची भीती

सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याने ते घरीच राहून उपचार घेत आहेत. शेजारच्या लोकांनाही याची कल्पना येत नाही. एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य सेविका या दोन ते आठ दिवसांनी त्यांच्या घरी पोहोचून होम क्वारंटाईनच्या सूचना देतात. तोपर्यंत ती व्यक्ती बिनधास्तपणे वावरत असते तसेच त्यांच्या घरातील कचरा सरसकट सर्वांबरोबरच नेला जातो. सध्या अनेक इमारती अथवा मजले सील करण्यात आल्याने त्यांच्याकडील कचरा हा स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. पण अशाप्रकारे काही रुग्ण आपल्याला कोरोना झाल्याची माहिती लपवत असल्याने, त्यांची कल्पना इमारतीतील रहिवाशांना येत नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील कचरा एकत्र वाहून नेल्यामुळे संसर्ग अधिक पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.

अशी लावली जाते कच-याची विल्हेवाट

यासंदर्भात घनकचरा विभागाचे प्रमुख अभियंता व उपायुक्त अशोक यमगर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोरेानाबाधित रुग्णांच्या घरातील व होम क्वारंटाईन केलेल्या घरातील कचरा स्वतंत्रच विल्हेवाट लावला जात आहे. मागील पध्दतीनुसारच हा कचरा गोळा केला जातो आणि त्याची विल्हेवाट लावली जाते. यामध्ये बायोमेडिकल वेस्ट वेगळा आणि घरातील इतर कचरा वेगळा गोळा केला जातो. बायोमेडिकल वेस्टमध्ये मास्क, हातमोज्यांसह इतर वस्तू ज्यांची विल्हेवाट एसएमएस कंपनीच्या माध्यमातून लावली जाते. तर घरातील कचरा हा गोळा करुन देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मोठा खड्डा खणून त्यामध्ये त्याची विल्हेवाट लावली जाते. सध्या सील मजला व इमारतीमधील कचऱ्याची विल्हेवाट अशाच पध्दतीने लावली जात आहे.

(हेही वाचाः पोलिसांना धोका वाढला, मुंबईत कोरोनाने १०१ पोलिसांचा मृत्यू!)

…तर आपल्या घरातील कचरा स्वतंत्र बांधून ठेवावा

एखादी व्यक्ती जर बाधित निघाली आणि ती जर लक्षणे नसल्याने घरी राहून उपचार घेत असेल, तर त्या व्यक्तीने आपल्या घरातील बायोमेडिकल वेस्ट व इतर कचरा स्वतंत्र बांधून ठेवावा. इमारती व सोसायटीतील सफाई कामगारांकडे तो इतर कचऱ्यासोबत देऊ नये. तर इमारती खाली तो एका ठिकाणी बांधून ठेवावा, जेणेकरुन महापालिकेचे कर्मचारी तो घेऊन जातील. जर शक्य असल्यास त्या पिशवीवर तसे नमूद करावे. एक जबाबदार नागरिक म्हणून आता प्रत्येक नागरिकांनी अशाप्रकारे कचरा स्वतंत्र बांधून ठेवून, तो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा. जेणेकरुन यापासून होणारा संसर्ग रोखता येईल. त्याबरोबरच महापालिकेचे जे सफाई कामगार फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून सेवा बजावतात, त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही, असे यमगर यांनी स्पष्ट केले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here