लडाखमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी असीम फाउंडेशनने उभारली वॉटर एटीएम

लडाखच्या शीत वाळवंटी भागातला पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत पुण्याच्या असीम फाउंडेशन या सामाजिक संस्थेने तिथे काही महत्त्वाच्या ठिकाणी ‘वॉटर एटीएम’ यंत्रे उभी केली आहेत. पर्यटकांकडे असलेल्या पाण्याच्या बाटल्या त्यांना पुन्हा भरुन घेता याव्यात, तसेच स्थानिक नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने पहिल्या फेरीमध्ये शे, ठिकसे, लामायुरू, दिस्किट या मॉनेस्ट्रीज मध्ये, खरू व निमू येथे स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही वॉटर एटीएम यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या यंत्रांचा वापर करण्यासाठी चलनी नाणी उदा. २,५,१० रुपये किंवा स्मार्ट कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. यातून येणारे उत्पन्न, यंत्रांची देखभाल करणाऱ्या व्यक्ती किंवा मॉनेस्ट्रीजसाठीच असणार आहे.

लोकार्पण सोहळा संपन्न

निसर्गरम्य लडाखमध्ये पर्यटकांकडून पाण्याच्या बाटल्यांचा अपरिमित कचरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, असीम फाउंडेशनने गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर उपाययोजना सुरू केली. संस्थेने २०२० मध्ये वॉटर एटीएमची संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि पुण्याच्याच एका कंपनीकडून काही यंत्रे तयार करुन घेतली. या यंत्रांचे काम बघून त्यात गरजेच्या सुधारणा करुन ‘नाम फाउंडेशन’च्या सहकार्याने १५ आणि १६ ऑगस्ट २०२१ रोजी ही यंत्रे लडाखमधील विविध महत्त्वाच्या जागी लावून लोकार्पित करण्यात आली. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात कारगिल, द्रास, पॅंगोंग इ. ठिकाणी ही यंत्रे बसवली जाणार आहेत. तसेच काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ तीन ठिकाणी लष्कराच्या मदतीने अशी यंत्रे बसवण्यात आली आहेत.

असीम फाउंडेशनचे ‘असीम’ कार्य

‘मैत्रीच्या माध्यमातून विकास’ या सूत्रानुसार असीम फाउंडेशनचे कार्यकर्ते जवळपास २० वर्षांपासून देशाच्या विविध भागांत कार्यरत आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीर, लडाख यांसह ईशान्य भारताचाही समावेश आहे. शिक्षण, उद्योजकता आणि विकास यांसाठी प्रामुख्याने संस्था कार्यरत आहे. जम्मू-काश्मीरमधील बंद पडलेल्या काही शाळा पुन्हा सुरू करण्यापासून ते तिकडच्या विद्यार्थ्यांना पुण्यात राहून उच्चशिक्षण घेता येईल याची सोय करण्यापर्यंत, तसेच पर्यटन विकासासोबत स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तयार करुन विकण्यासाठी उद्योजकता विकसित करण्यापर्यंत अनेक कामे असीम फाउंडेशन करत आहे. यामध्ये सीमावर्ती भागांतील नागरिक, हुतात्म्यांच्या वीर नारी, विविध सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य जागरुक नागरिकांचे सहकार्य संस्थेला मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here