विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या पिसे जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्वपदावर येत असून सद्यस्थितीत दोन ट्रान्सफार्मर सुरु होवून त्या आधारे २० पैकी १५ पंप सुरू करण्यात आले आहेत. मात्र,असे असले तरी, तिसरा ट्रान्सफार्मर सुरु होण्यास ५ मार्च २०२४ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. या कारणाने, संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका जल आभियंता विभागाने दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला सोमवारी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी लागलेली आग रात्री दहा वाजता विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले.
(हेही वाचा – Sessions Courts: अपमानाचा सूड उगवण्यासाठी ३ महिन्यांच्या चिमुरडीची हत्या करणाऱ्या तृतीय पंथीयाला फाशीची शिक्षा)
सोमवारी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे चार वाजल्यापासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले. तर, सकाळी नऊ वाजेपासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तोही सुरू करण्यात आला व त्यावर पिसे पंपिंग केंद्रातील इतर सात पंप हळूहळू सुरू करण्यात आले. अशा रितीने सद्यस्थितीत पिसे केंद्रातील २० पैकी सुमारे १५ पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
या केंद्रातील उर्वरित पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच देखभाली खाली असलेल्या तिसऱ्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यासाठी साधारणतः येत्या ५ मार्च २०२४ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही; शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी)
अशा रितीने संपूर्ण पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्याला साधारणतः ५ मार्च २०२४ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेद्वारे होणारा एकूण पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४ मध्यरात्रीपासून ५ मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे.
तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. या पाणी कपातीमुळे विभागातील पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाचा भाग व डोंगराळ उंचीवरील भाग यास थोड्या अधिक प्रमाणात अपुरा पाणीपुरवठा जाणवू शकतो.
अचानक निर्माण झालेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा कमी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे. मुंबईकर नागरिकांनी या कपातीच्या कालावधीमध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community