गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नवी मुंबई महापालिका एक दिवस पाणी पुरवठा करणार नाही, याबाबत पालिकेने प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली होती. परंतु प्रत्यक्षात तीन दिवस झाले तरीही नवी मुंबईकर पाण्यापासून वंचित आहेत. महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गावर स्थलांतरीत करण्यासाठी व कळंबेली येथे एक्सप्रेस पुलाखाली दिवा – पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे असे पालिकेने या पत्रकाद्वारे सांगितले आहे.
( हेही वाचा : अजित पवार घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण, नेमके कारण काय?)
पाण्यासाठी पायपीट
वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त असतानाच आता पाण्याच्या समस्येला सामोरे लागत आहे. पाणी नसल्याने लोक घरातले हंडे घेऊन पाण्याच्या शोधात ठिकठिकाणी असलेल्या जलकुंडावर तसेच कौपरखैरणे येथील सेक्टर पाच ते आठच्या उद्यानात गर्दी करत आहेत. सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्याने लोकांचे हाल झाले आहेत.
पालिकेचा अजब कारभार
भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीची काम चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार सकाळी १० ते मंगळवार सकाळी १० पर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद होता. संध्याकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल असे पालिकेने सांगितले होते परंतु तरीही पालिकेने पाणी सोडले नाही.
पाण्याविना हाल, नागरिक संतप्त
“पाणी मंगळवारी संध्याकाळी येणे अपेक्षित होते पण सकाळ उलटली तरी पाणी नाही, आता ( बुधवारी ) दुपारी पाणी आले ते पाणीसुद्धा गढूळ असून पिण्यायोग्य नाही. पाण्यावाचून हा तिसरा दिवस सुरू आहे. आता पाण्याविना मरायचे की हॆ कमी दाबाचे गढूळ, अस्वच्छ पाणी पिऊन मरायचे… एका तहानलेल्या नियमित करदात्याचा प्रश्न?” अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.
Join Our WhatsApp Community