मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत गुरूवारी ७ डिसेंबर २०२३ रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्यासाठी शहर भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात (Water Cut) केली जाणार आहे.
गुरूवार, दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी कप्पा रिक्त केल्याने, मुंबई शहरातील काही भागात १०० टक्के तर काही भागात ५० तक्क्यापर्यंत पाणी कपात केली जाणार आहे.
गुरुवारी ०७ डिसेंबर २०२३ रोजी या पाणीकपाती (Water Cut) दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल असेही जलाभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.
या भागात असा राहणार पाणी पुरवठा
‘ए’ विभाग-
कफ परेड व आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत)- याठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहिल.
नरिमन पॉईट व जी. डी. सोमाणी – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.४५ ते ३ वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात ५० टक्के पाणीपुरवठ्यात करण्यात येईल.
मिलीट्री झोन– (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) – पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात येईल.
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
सी विभाग-
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
डी विभाग-
पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी १ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल.
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
जी उत्तर व जी दक्षिण विभाग-
जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.