-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत विहिरींमधील पाण्याचा टँकरद्वारे विविध भागांमधील सोसायट्यांना मागणीनुसार पुरवठा केला जात असला तरी या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरवर पिण्याव्यतिरिक्त अन्य वापराचे पाणी अर्थात नॉट पोटेबल वॉटर असे लिहिणे बंधनकारक आहे. परंतु मुंबईत विहिरींमधील पाण्याचा पुरवठा होणाऱ्या टँकरवर पिण्याचे पाणी असा स्पष्ट उल्लेख केला जात आहे. विहिरींचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असून टँकरवर अशाप्रकारे पिण्याचे पाणी असा उल्लेख केला जात असल्याने मुंबईकरांची फसवणूक केली जात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. (Water)
मुंबईतील विहिरींचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याने त्याचा वापर पिण्याकरता करू नये अशाप्रकारे वारंवार आरोग्य विभागाच्यावतीने जारी केले जाते. त्यामुळे मुंबईत विहिरींमधून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरवर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने पिण्याव्यतिरिक्त इतर वापराचे पाणी अशाप्रकारचा उल्लेख करावा असे बजावले जाते. त्यामुळे मुंबईतील अनेक टँकरवर नॉन पोटेबल वॉटर असा उल्लेख केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रातून केल्या जाणाऱ्या टँकरमधीलच पाणी पिण्यासाठी वापरले जात असून विहिरींचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणासाठी वापरले जाते. मुंबईत सुमारे १८,९११ एकण विहिरी असून यामध्ये ४६३८ विहिरी, १२५६१ विंधन विहिरी आणि १८५३ कंगर अर्थात रिंगवेल आहे. या सर्व विहिरींमधून प्रति विहिर, प्रति दिन २०,००० लिटर पाण्याचा उपसा गृहीत धरला तर दिवसाला ३५९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. (Water)
(हेही वाचा – मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार पैशाच्या रूपात मोबदला; MMRDA ने काय घेतला निर्णय?)
मुंबईमध्ये वाढत्या उष्म्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली असून त्यातच अनेक विभागांमध्ये जलवाहिनींची दुरुस्ती तसेच अनेक भागांमध्ये जुन्या जलवाहिनी यामुळे कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे टँकरमधील पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र मुंबईत विहिरींचे पाणी हे पिण्याचे पाणी म्हणून विकले जात असून टँकरवरच पिण्याचे पाणी असा स्पष्ट उल्लेख केला जात आहे. असा उल्लेख असणाऱ्या टँकरमध्ये विहिरींचे पाणी भरले जात असून त्या पाण्याचा पुरवठा लोकांना केला जातो. दादरमध्ये पोर्तुगिज चर्चकडे जाणाऱ्या मार्गावर इनोव्हेटीव्ह इंजिनिअर्स या टँकरवर पिण्याचे पाणी आहे असे स्पष्ट लिहिले गेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली विहिरींमधील पाण्याचा पुरवठा केला जात आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Water)
याबाबत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईत महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रावरील टँकरचे पाणी पिण्याकरता वापर केला जावू शकतो. परंतु विहिरींचे पाणी पिण्याकरता वापर केला जावू शकत नाही, किंबहुना तसा पुरवठाही करता येऊ शकत नाही. विहिरींमधून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरवर पिण्याव्यतिरिक्त इतर वापराकरता असा उल्लेख करणे आवश्यक आहे. तसा उल्लेख टँकरवर न लिहिणे अयोग्य आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीमध्ये जर विहिरींमधील पाण्याचा पुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो किंवा टँकरवर तसा उल्लेख केला असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते, असेही स्पष्ट केले आहे. (Water)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community