भांडुप संकुलात पाणी शिरल्याने मुंबईकरांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची वेळ आल्यानंतर महापालिकेने संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत उभारणे, तसेच संकुलातील मुख्य जलप्रक्रिया इमारतीभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे आणि संकुल व परिसरातील पर्जन्य जल निःसारण प्रणालीची क्षमता वाढवणे असे निरनिराळे निर्देशही अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. शिवाय संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून भांडुप संकुलामध्ये शिरणारे पावसाचे पाणी तुळशी तलावामध्ये वळते करुन पूरस्थिती टाळता यावी यासाठी, विशेष प्रवाह मार्ग तथा नाला बांधण्याची विनंती अभयारण्याच्या संचालकांकडे करण्याचेही सूचना वेलरासू यांनी दिल्या आहेत.
भांडुप जलशुद्धीकरण संकुलाची पाहणी केली!
भांडुप परिसरात १७ जुलै रोजी रात्रीनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज सोमवारी पाहणी केली. याचा आढावा घेताना, पावसाचे पाणी नेमके संकुलात कसे शिरले, संयंत्रे दुरुस्ती करताना प्रत्यक्षात काय अडथळे जाणवले, याबाबतची संपूर्ण माहिती उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर यांनी यावेळी सादर केली.
आशिया खंडातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प!
भांडुप जलशुद्धीकरण संकुल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकट्या प्रकल्पामध्ये केले जाते. संकुलातील दोन पैकी एका जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन १,९१० दशलक्ष लीटर तर दुसऱ्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ९०० दशलक्ष लीटर इतकी आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर संपूर्ण संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून येणारे पुराचे पाणी तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्याची विनंती उद्यान प्रशासनाकडे करणे यासह विविध निर्देश त्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community