यंदा मुंबईकरांची 100 टक्के तहान भागणार

मुंबईकरांची तहान पुढील जुलै महिन्याच्या पुढे भागवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे आता काठोकाठ भरली असून, मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्याइतपत पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सुमारे १४ लाख ४८ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून, त्या तुलनेत १४ लाख ३६ हजार १३६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. तलाव आणि धरणांत एकूण ९९.२३ टक्के एवढा पाणीसाठा असून, त्यामुळे मुंबईकरांची तहान आता शंभर टक्के भागणार आहे.

जुलै २०२२ पर्यंत पाणीसाठा पुरणार

मुंबईला दरदिवशी ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे तलाव आणि धरणांमध्ये १ ऑक्टोबर रोजी जमा असणाऱ्या पाणीसाठ्यावर संपूर्ण वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन मुंबई महापालिका करत असते. त्यामुळे एकूण पुरवठ्याच्या केवळ ०.७७ टक्के एवढाच पाणीसाठा कमी असून, ठाणे महापालिका आणि भिवंडी महापालिका यांना देण्यात येणारे पाणी वगळता मुंबईकरांची तहान पुढील जुलै महिन्याच्या पुढे भागवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

(हेही वाचाः खुशखबर! मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव, धरणे भरली!)

मागील तीन वर्षांपेक्षा अधिक पाणीसाठा

सध्या मुंबईतील सर्व धरण व तलावांमध्ये एकूण १४ लाख ४८ हजार ३६३ दशलक्ष लिटर(१ लाख ४४ हजार ८३६ कोटी लिटर) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. संपूर्ण मुंबईची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर(१ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर) एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे केवळ १२ हजार दशलक्ष लिटर एवढाच पाणीसाठा कमी असला, तरी मागील तीन वर्षांच्या १ ऑक्टोबरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यावर्षी अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येते. सन २०१९ व २०२० मध्ये अनुक्रमे ९८.८४ टक्के, ९९.०५ टक्के एवढा पाणीसाठा होता.

पाणीकपातीचे संकट टळले

विशेष म्हणजे पाहिले दीड ते दोन महिने तलाव क्षेत्रात पाऊस न पडल्याने पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ दर्शवली जात नव्हती. त्यामुळे जर हीच परिस्थिती राहिली तर मुंबईत पाणीकपात लागू करण्याच्या विचारात महापालिका जल अभियंता विभाग होता. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पडलेला मुसळधार पाऊस पुढे कायम राहिल्याने मुंबईची तहान भागवण्याचे टार्गेट १ ऑक्टोबरला पूर्ण झाले.

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

तलावातील या पुरेशा जल साठ्यामुळे जल अभियंता विभाग सुखावला असून, आता अपु-या पाणीसाठ्यामुळे पाणीकपात करावी लागणार नाही. केवळ जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामांसाठीच कपात करण्याची वेळ येईल, असे बोलले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here