Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या मेट्रोच्या ‘त्या’ कंत्राटदाराला महापालिकेची नोटीस

अंधेरी पूर्व येथे वेरावली-३ सेवा जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या, १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेच्या चमूने सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण केली आहे.

3385
Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या मेट्रोच्या 'त्या' कंत्राटदाराला महापालिकेची नोटीस
Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या मेट्रोच्या 'त्या' कंत्राटदाराला महापालिकेची नोटीस

अंधेरी पूर्व येथे वेरावली-३ सेवा जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या, १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेच्या चमूने सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण केली आहे. मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली होती. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही सुरु असून यावर केलेला खर्च, वाया गेलेल्या पाण्याचा नियमानुसार आकार व दंड अशी सर्व मिळून रक्कम गणना केली जाईल आणि त्याची वसुली संबंधिताकडून करण्यात येईल, असे महापालिकेच्या जल अभियंता विभागाने स्पष्ट केले. (Water Pipeline)

या जलवाहिनी दुरुस्ती कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार दुरूस्ती कामाच्या ठिकाणी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार मिळून तब्बल शंभरपेक्षा जास्त मनुष्यबळ तळ ठोकून होते. या सर्वांच्या अथक व अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळेच ही जलवाहिनी दुरूस्ती योग्यरितीने पूर्ण करणे शक्य झाले. (Water Pipeline)

मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली होती. सर्वात महत्वाचे प्राधान्य दुरुस्तीला असल्याने महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग त्याचप्रमाणे विभाग कार्यालयांची संपूर्ण यंत्रणा दुरुस्ती कार्यवाहीसाठी तैनात होती. शनिवार २ डिसेंबर २०२३ आणि रविवार ३ डिसेंबर २०२३ असे दोन दिवस साप्ताहिक सुट्टी होती. सोमवारी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता या संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे जल अभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये जलवाहिनीला पोहोचलेले नुकसान, दुरुस्तीसाठी सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर केलेला खर्च, वाया गेलेल्या पाण्याचा नियमानुसार आकार व दंड अशी सर्व मिळून रक्कम गणना केली जाईल आणि त्याची वसुली संबंधिताकडून करण्यात येईल, असेही जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. (Water Pipeline)

जलवाहिनी दुरूस्तीसाठी तयार केले दोन मॅनहोल-

अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ जवळ गुरुवारी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ड्रिलिंग काम सुरु असताना, वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. मुख्य जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली. परिणामी वेरावली क्रमांक १, २ आणि ३ तसेच घाटकोपर अशा चार सेवा जलाशयांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. महानगरपालिका प्रशासनाने या जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. जल वाहिनीतून पाणी प्रवाहित असल्याने अंतर्गत भागातून दुरुस्ती करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बाहेरून दुरूस्तीसाठी जलवाहिनीला दोन मॅनहोल तयार करण्यात आले आणि त्याद्वारे जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. (Water Pipeline)

दुरूस्तीचे काम आव्हानात्मक

या जलवाहिनीची दुरुस्ती ही एरवीच्या दुरुस्ती कामांपेक्षा वेगळी, अतिशय खडतर व आव्हानात्मक होती. कारण की, ज्या ठिकाणी गळती लागली ती जलवाहिनी जमिनीत सुमारे सहा मीटर खोल आहे. तसेच या परिसरात अलीकडे बांधकाम झाल्यानंतर जमिनीचा भराव पूर्ववत केलेला असल्याने तुलनेने त्याची भूगर्भीय पकड सैल आहे. त्यामुळे अधून मधून ती मातीही गळती झालेल्या खड्ड्यात कोसळत होती. स्वाभाविकच मुख्य जलवाहिनी पूर्ण रिकामी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पाण्याचा उपसा करणे आणि त्याचवेळी दुरुस्तीसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी भूस्खलन होऊ न देणे, हे अतिशय मोठे आव्हान पेलून दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. एवढेच नव्हे तर या जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली होती. त्यामुळे जलवाहिनी पूर्ण रिती करुन आत शिरून ही सर्व छिद्र बंद करावी लागणार होती. मात्र, पाणी पूर्णपणे बाहेर काढणे शक्य होत नसल्याने बाहेरच्या बाजुने ही गळती बंद करण्याचे काम करावे लागले. (Water Pipeline)

(हेही वाचा – Dadar Vanita Samaj : दादरच्या वनिता समाज संस्थेच्या भाडेकराराचे अखेर नुतनीकरण होणार, सन २०४७ पर्यंत भाडेकरारात वाढ)

बाधित भागांमध्ये २४६ पेक्षा अधिक टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पश्चिम उपनगरांमध्ये पाणीपुरवठा बाधित झालेला परिसर अधिक होता. या भागांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतःचे टँकर वापरून ६९ फेऱ्या आणि खासगी टँकरच्या १७७ फेऱ्या असे मिळून एकूण २४६ फेऱ्या करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय एल आणि एन विभागामध्ये देखील नागरिकांना टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात आले. (Water Pipeline)

पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी

आज दुपारच्या सुमारास जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार करून सेवा जलाशय भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेवा जलाशय भरुन के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम, एन आणि एल विभागात सोमवार सायंकाळपासून टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल. दैनंदिन पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी काहीसा कालावधी लागू शकतो, तोवर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तोवर कृपया नागरिकांनी संयम राखावा आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन जलअभियंता विभागाने केले आहे. (Water Pipeline)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.