राज्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबरमध्येच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठा २० टक्क्यांनी कमी झाला असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या १२०० हून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. (Shortage of Water)
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पावसाळा संपताच राज्याला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. राज्य सरकारने आधी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली. त्यानंतर गेल्याच आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या तालुक्यांव्यतिरिक्त ९५४ महसुली मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, १० नोव्हेंबरला प्रसृत केलेल्या शासन आदेशात १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. म्हणजेच दुष्काळग्रस्तांच्या यादीत आणखी ६७ महसुली मंडळांची भर पडली आहे.
(हेही वाचा : Uttarkashi Tunnel Accident : तीन दिवस उलटूनही मजूर बोगद्यातच ,अन्य कामागारांची निदर्शनं)
राज्यातील १२४५ गावे व वाडय़ांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच वेळी एकाही गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला नव्हता. मात्र यंदा पावसाळा संपता संपताच पाणीटंचाई भेडसावू लागली असून, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याचे संकेत आहेत. राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांतील आणि महसुली मंडळांमधील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट आदी सवलती शासन आदेशाद्वारे जाहीर करण्यात आल्या आहेत. टंचाई जाहीर करण्यात आलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हेही पहा –