मुंबईकरांसमोर जलसंकट… पाणीकपातीची दाट शक्यता

एरव्ही जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून मुसळधार पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढत जाते. पण ही पातळी मागील काही दिवसांपासून एकाच जागी स्थिर आहे.

136

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होत असली, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील साठ्यांत वाढ होताना दिसत नाही. अर्धा पावसाळा निघून गेला तरी तलावांमधील पाणीसाठा १७ टक्क्यांच्या पुढे सरकत नसून, मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा निम्मा असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी आता जलसंकट उभे राहण्याची भीती वर्तवली जात असून, पुढील आठवड्यापर्यंत मुंबईत पाणीकपात लागू करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण पावसाळ्यात केलेल्या पाणीकपातीचा लाभ मुंबईकरांना पुढील काळात चांगल्याप्रकारे होऊ शकतो आणि पावसाळ्यात कपात केल्यास त्याचा तेवढा परिणाम मुंबईकरांवर होत नसल्यानेच ही कपात याच महिन्यात लागू केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

पाणीसाठा कमी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा धरणांमधून १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा अपेक्षित मानला जातो. त्या तुलनेत सध्या या सर्व धरण व तलावांमध्ये १५ जुलै २०२१ पर्यंत २ लाख ५० हजार ८१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. अर्थात वर्षभराच्या एकूण साठ्याच्या केवळ १७.२८ टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध असून, मागील वर्षी याच कालावधीत २५ टक्के तसेच त्याआधीच्या वर्षी ४८.२१ टक्के एवढा पाणीसाठा होता.

(हेही वाचाः मिठी नदीवरील महापालिकेचे अर्धवट काम एमएमआरडीए करणार पूर्ण)

म्हणून होऊ शकते पाणीकपात

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईत मागील वर्षी पडलेल्या पावसामुळे धरणात ३० जुलै २०२१ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक होता. परंतु त्यानंतर या पाणीसाठ्यात वाढ होणे अपेक्षित होते. पण १५ जुलै उलटला तरीही पाणीसाठ्यात वाढ दिसून येत नाही. १७ ते १८ टक्क्यांमधील वाढ ही नियंत्रितच असून त्यात कुठलीही वाढ होत नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी धोक्याची सूचना आहे. आजवर ४० ते ४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परंतु त्याप्रमाणे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसली नाही. एरव्ही जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून मुसळधार पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढत जाते. पण ही पातळी मागील काही दिवसांपासून एकाच जागी स्थिर आहे. यामध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांवर पाणी कपात लागू करण्याचा विचार जलअभियंता विभाग करत आहे.

जबाबदारीने वागण्याची गरज

पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पुढील १५ दिवस हे महत्वाचे मानले जात आहेत. जर त्यात ही वाढ अपेक्षितपणे न झाल्यास मुंबईकरांवर जलसंकट येऊ शकते. याचा निर्णय पुढील आठवड्यातच घेतला जाण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही तेवढी भीतीची परिस्थिती नसली तरीही आतापासून सावधपणाने वागल्यास, भविष्यात अधिक पाण्याचा साठा निर्माण करण्यास मदत होईल. उन्हाळ्यात कपात लागू करण्याऐवजी या पावसाळ्यात कपात करुन जलसाठ्यात वाढ केल्यास मुंबईच्या दृष्टीने हिताचे ठरेल आणि जलसंकट टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपने उपसल्या विरोधाच्या तलवारी! शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा)

पावसाचा अंदाज घेऊन कपातीचा निर्णय

सध्या प्रत्येक दिवशी पडणाऱ्या पावसाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. तसेच त्यामुळे जलसाठ्यात किती वाढ होते हेही पाहिले जात आहे. यात जलसाठ्यात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. तरीही या महिन्याच्या अखेरीपर्यंत पावसाचा अंदाज घेतला जाईल आणि त्यानुसार पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्याच्या शेवटी जो साठा असेल त्यावर कपातीचा निर्णय प्रशासन घेईल, असे उपायुक्त (अभियांत्रिकी विभाग) अजय राठोर यांनी सांगितले.

मागील तीन वर्षांतील १५ जुलैपर्यंतचा पाणीसाठा

१५ जुलै २०२१ : २ लाख ५० हजार ८१ दशलक्ष लिटर( १७.१८टक्के)

१५ जुलै २०२० : ३ लाख ६१ हजार १११ दशलक्ष लिटर( २४.९५टक्के)

१५ जुलै २०१९ : ६ लाख ९७ हजार ७६० दशलक्ष लिटर( ४८.२१टक्के)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.