मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयात जुलै २०२४ मध्ये दमदार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. १ जुलै ते २५ जुलै २०२४ या कालावधीत पाणीसाठ्यात सुमारे ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात सोमवारी २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत असल्याची घोषणा जल अभियंता विभागाने केली आहे. (Water Supply)
यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभापर्यंत मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पाणीसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ३० मे २०२४ पासून ५ टक्के तर दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींना महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात देखील ही कपात नियत दिनांकापासून लागू करण्यात आली होती. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला वार्षिक पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. (Water Supply)
(हेही वाचा – Palghar सह Thane जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी; उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली)
सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण भरून वाहू लागले आहेत. पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक स्थितीत पोहोचल्यामुळे आता १० टक्के पाणी कपात सोमवारी २९ जुलै २०२४ पासून रद्द करण्यात येत आहे. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींना महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपातही सोमवार २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे. (Water Supply)
पाणी कपात रद्द केल्याने टोकाच्या (टेल एंड) वस्त्या, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच, संपूर्ण महानगराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत असला आणि पाणी कपात मागे घेण्यात येत असली तरी नियमित सवयीचा भाग म्हणून नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे विनम्र आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. (Water Supply)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=7i_JuDSJLt8
Join Our WhatsApp Community