मुंबईतील ‘या’ भागात दर शनिवारी पाणीपुरवठा होणार बंद

पूर्व उपनगरातील ‘एल’ विभागामधील खैरानी रोडखाली असणा-या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर या दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम करणे आवश्यक आहे. मात्र, या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याने व सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांची गैरसोय होवू शकत असल्याने महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने याबाबत सकारात्मक विचार करुन सदर काम हे टप्प्या-टप्प्याने करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सदर काम हे टप्प्या-टप्प्याने १० दिवसात अर्थात सलग १० शनिवारी करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच कळविण्यात आले आहे.
यानुसार ४ मार्च २०२३ रोजी सदर परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. आता येत्या शनिवारी ११ मार्च २०२३ रोजी देखील या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. यानुसार, शनिवार, ६ मे २०२३ पर्यंतच्या प्रत्येक शनिवारी ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तरी सदर परिसरातील नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून व काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून दर रविवारी येणारे पाणी हे गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
यामुळे ‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरांमध्ये शनिवार, ४ मार्च पासून ते शनिवार ६ मे २०२३ पर्यंत सलग १० शनिवार पाणीपुरवठा पूर्णतः बंद असण्याबाबत यापूर्वीच महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी म्हणजेच ११ मार्च २०२३ रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे. ‘एल’ विभागातील वर नमूद केलेल्या परिसरांमध्ये ११ मार्च २०२३, १८ मार्च २०२३, २५ मार्च २०२३, १ एप्रिल २०२३, ८ एप्रिल २०२३, १५ एप्रिल २०२३, २२ एप्रिल २०२३, २९ एप्रिल २०२३ आणि ६ मे २०२३ या दिवशी पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल, असेही माळवदे यांनी पुन्हा एकदा कळविले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here