शीव-अँटॉप हिल-माटुंगाकरांना दिलासा! पाणी पुरवठा झाला सुरळीत

शीव-अँटॉपहिल-माटुंगाकरांना महापालिकेकडून भाऊबीज भेट

128

मागील काही दिवसांपासून शीव-अँटॉप हिल परिसरात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाल्याने विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अभियंत्यांनाच टार्गेट केले होते, तर भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी निवेदनांनी भरलेला हंडा एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांना भेट म्हणून दिली होती. परंतु त्यानंतर जलअभियंता विभागाने हाती घेतलेल्या शोध मोहिमेत शीव येथील जे. के. भसीन मार्गावर तीन ठिकाणी गळती आढळून आली. ही गळती भायखळा परिरक्षण (मेटेनन्स) विभागाने गळती शोधून काढताना ऐन दिवाळीत त्याच्या दुरुस्तीचे काम करत येथील जनतेची दिवाळी कोरडी जावू दिली नाही. त्यामुळे शीव-अँटॉप हिलमधील लोकांना भाऊबीजेची भेट देत पाणी पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करून दिला आहे.

शीव –अँटॉप हिल भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पाणी समस्येचा स्फोट दिवाळीपूर्वीच झाल्यानंतर एफ-उत्तर विभागातील जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी या पाणी समस्येचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रावळी उच्चस्तर जलाशयामधून निघणारी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी हरी मंदिर समोर, जे के भसीन मार्ग येथे गळती झाल्याचे आढळून आल्यानंतर एफ- उत्तर विभागाच्या सहाय्यक अभियंता जलकामे यांनी याची तक्रार भायखळा परिरक्षण विभागाला दिली. त्यानुसार भायखळा परिरक्षण विभागाने त्वरीत हे काम सुरू केले. रस्ता खोदकाम केल्यानंतर या १२०० मि.मी ही जलवाहिनी तळाशी फुटलेली होती. हे काम बाहेरून करणे शक्य नसल्यामुळे त्यावर एक मॅनहोल बसविण्यात आले.

(हेही वाचा – शीव-माटुंग्यात पाणीबाणी! हंडाभर पाण्यासाठी भाजपकडून सहायक आयुक्तांना निवेदन)

पालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना यश

जलवाहिनीवरील या मॅनहोलमध्ये मोठे मोठे पंप टाकून पाणी काढून जलवाहिनी पूर्णपणे रिकामी करण्यात आली. त्यानंतर मॅनहोलधून जलवाहिनीच्या आत शिरुन तपासणी करून गळती असलेल्या नेमक्या ठिकाणी आतून लोखंडी पट्टीच्या सहाय्याने वेल्डिंग करत याची दुरुस्ती करण्यात आली. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे पाणी पुरवठा खंडित न करता त्यांनी हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. तीन ठिकाणी ही गळती होती, त्यामुळे तिन्ही ठिकाणी तीन बाय तीन इंच, दहा बाय दहा इंच आणि बारा बाय बारा इंचाचे ठिंगळे लावण्यात आली आहे. ही वेल्डींग आतील बाजुने करण्यात आली. त्यानंतर या भागातील पाणी पुरवठा पूर्ववत झाला असून ज्या शीव, माटुंगा व अँटॉप हिल परिसरात पाण्याची समस्या जाणवत होती, ती समस्या ऐन दिवाळीतच दूर करण्यात महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

महिलांना मिळाली भाऊबीजेची भेट

भायखळा परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता शैलेंद्र सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम अभियंता अभिजित देसाई व कनिष्ठ अभियंता सत्यजीत भाटे तसेच कामगार आणि एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे व अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने हे काम तातडीने पूर्ण करतच लोकांची दिवाळीत पाण्यावाचून वणवण होवू नये आणि नगरसेवकांना लोकांच्या प्रक्षोभाला सामोरे जावू नये याची काळजी जलअभियंता विभागाने घेतली. विशेष म्हणजे या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी असतानाही त्यांनी लोकांची पाण्यावाचून परवड होवू नये म्हणून दिवसरात्र एक करत ही समस्या दूर करून किमान भाऊबीजेपर्यंत येथील पाणी पुरवठा सुरळीत करताना येथील महिलांना एकप्रकारे भाऊबीजेची भेटच दिल्याचे समाधान या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.