पाण्याच्या टाक्या ३० एप्रिलपर्यंत साफ करा, अन्यथा… 

कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक करणे, निकामी-भंगार साहित्‍यांची विल्‍हेवाट लावण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. 

100

मुंबईत हिवताप अर्थात मलेरियाच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी एकूण ७ हजार ३५८ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्‍यात आले. त्यातील २८ हजार ९०४ टाक्यांपैकी २२ हजार २१३ (७६.८५ टक्‍के) टाक्यांमध्ये डास प्रतिबंधक करण्यात आल्याचे आढळून आले. पण उर्वरीत ६ हजार ५४९ (२२.६६ टक्के) टाक्या या अद्यापही डास प्रतिबंधक करण्यात आलेल्या नसून पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्यासह निकामी साहित्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ही ३० एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांन बजावले आहे. जर ३० एप्रिलपर्यंत या टाक्या साफ न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

निकामी-भंगार साहित्‍याची विल्‍हेवाट लावण्याचे आवाहन!   

मुंबईत मागील पाच वर्षांमध्‍ये हिवताप (मलेरिया) आजाराच्‍या प्रतिबंधासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. सन २०३० पर्यंत हिवतापाचे समूळ उच्‍चाटन करण्‍याच्‍या महत्‍त्‍वाकांक्षी उद्देशाने महानगरपालिका प्रशासन  काम करत असून त्‍यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य आवश्‍यक आहे. यंदाही सर्व यंत्रणांनी आपापल्‍या अखत्‍यारितील कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक करणे, निकामी-भंगार साहित्‍याची विल्‍हेवाट लावण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

साथीच्या रोगांवर प्रतिबंध आणण्यासाठी उपाययोजना!

येत्‍या पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर, मुंबईत हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्‍सम आजारांना प्रतिबंध म्‍हणून महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. त्‍याचा एक भाग म्‍हणून मुंबईसाठी डास निर्मूलन समितीची सभा समितीचे अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मंगळवार, २३ मार्च रोजी दुपारी बैठक झाली. त्याप्रसंगी सदस्यांशी संवाद साधतांना आयुक्तांनी हा इशारा देतानाच जनतेला पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे आवाहन केले आहे.  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्‍य) देवीदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांच्‍यासह राज्‍य सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्‍य रेल्‍वे, पश्चिम रेल्‍वे, म्‍हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, नौदल, वायूदल, सैन्‍यदल, बेस्‍ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे २७ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा : बुरा न मानो, कोरोना है!)

२२,२१३ टाक्या डास प्रतिबंधक आढळल्‍या!   

शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणांच्‍या हद्दीतील मालमत्तांसह कार्यालय परिसरांमधील पाणी साठवण्याच्‍या टाक्‍या, शासकीय परिसरांमध्‍ये असलेले निकामी, निकृष्‍ट व भंगार साहित्‍याची ठिकाणे याबाबत केलेल्‍या सर्वेक्षणाची सांख्यिकी देताना प्रारंभी, महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी छायाचित्रांसह संगणकीय सादरीकरण देखील केले. यंदा एकूण ६७ यंत्रणांच्‍या हद्दीत मिळून ७ हजार ३५८ मालमत्‍तांचे सर्वेक्षण करण्‍यात आले. त्‍यात असलेल्‍या २८ हजार ९०४ टाक्यांपैकी २२ हजार २१३ (७६.८५ टक्‍के) टाक्या डास प्रतिबंधक आढळल्‍या आहेत. उर्वरित ६ हजार ५४९ (२२.६६ टक्के) टाक्या अद्याप डास प्रतिबंधक करण्यात आलेल्या नाहीत. त्‍याबाबतची योग्‍य कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना या यंत्रणांना करण्‍यात आल्‍याचे नारिंग्रेकर यांनी नमूद केले. तसेच पाणी साचून डासांची उत्‍पत्‍ती होवू नये, यासाठी आवश्‍यक असलेल्‍या उपाययोजना दरवर्षी कशा केल्‍या जातात, त्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

डासांची उत्‍पत्‍ती रोखणे, हा मूळ उद्देश!  

सर्व यंत्रणांनी पाणी साठवण्‍याच्‍या टाक्‍यांचे डास प्रतिबंधन करणे आवश्‍यक आहे. पाण्‍याच्‍या टाक्‍यांची गळती रोखणे, टाक्‍यांना झाकण किंवा आच्छादन लावणे, कोठेही निकामी साहित्‍य व भंगार पडलेले असल्‍यास तेथे पाणी साचू न देणे, अशा साहित्‍याची योग्‍यरित्‍या विल्‍हेवाट लावणे आवश्‍यक आहे, अशी सूचना त्‍यांनी केली. ३० एप्रिल २०२१ पर्यंत सर्व यंत्रणांनी ही कार्यवाही करणे अपेक्षित आहे, त्‍यासाठी समर्पित भावनेने पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले. या आजारांना रोखण्‍यासाठी नागरिकांसमवेतच सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य आवश्‍यक असून मुख्‍यत्‍वाने डासांची उत्‍पत्‍ती रोखणे, हा मूळ उद्देश असल्‍याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.