गेली दोन वर्ष राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. अशा परिस्थितीतच पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासकांनी अंदाजपत्रकीय सभेत, पाणीपट्टीमध्ये तब्बल २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक अडचणीत आलेले असताना, पाणीपट्टी एकदम २५ टक्के वाढवणे चुकीचे आहे. प्रशासनाचा हा निर्णय सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करावा आणि पाणीपट्टी आकारणी पूर्वीच्या दराने करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे माजी नगराध्यक्ष साधना भोसले लेखी निवेदनाद्वारे करणार आहेत.
( हेही वाचा : भारतवासियांचे रशियाला समर्थन! ट्विटर ट्रेन्ड होतोय #IStandWithPutin… )
या कारणास्तव घेतला निर्णय
आमच्या मागणीची दखल घेऊन दरवाढ रद्द केली नाही, तर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी दिला आहे. पंढरपूर पालिकेत सध्या प्रशासक आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर नगरपालिकेची अंदाजपत्रकीय सभा झाली. या सभेत पाणी पुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न यामध्ये सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची तफावत आहे. या कारणामुळे हा तोटा कमी करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपट्टीमध्ये २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community