- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी वाढत असून दोन वर्षांपूर्वी ०.३३ टक्के पाण्याचे नमुने आढळून आले होते, तिथे सन २०२३-२४ या वर्षांत हे प्रमाण वाढून ०.४६ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील आठ ते दहा वर्षांपूवी दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण जेवढे होते, त्यातुलनेत आता दूषित पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचेही पहायला मिळत आहे.
मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत होणाऱ्या तसेच जलाशयांमधील पाण्याचे नमुन्यांची तपासणी महापालिकेच्या विश्लेषक प्रयोगशाळेत केली जाते. त्यानुसार वर्षभरात घेण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यातील निष्कर्ष समोर आला असून त्यात मागील वर्षभरात दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ टक्के असल्याचे आढळून आले आहे. त्या आधीच्या वर्षी हे प्रमाण ०.९९ टक्के एवढे होते. तर त्या आधीच्या वर्षी हे प्रमाण ०.३३ टक्के एवढे होते. (Water)
(हेही वाचा – Cemetery : वर्सोव्यात बोहरी मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान)
विशेष म्हणजे मालाड पी उत्तर विभागात दूषित पाण्याचा एकही नमुना आढळून आला नसून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, वडाळा, शीव या भागांमध्ये ०.०१ टक्के तर अंधेरी पश्चिम, कांदिवली आणि ग्रॅटरोड, गिरगाव आदी विभागांमधील दूषित पाण्याचे प्रमाण हे ०.०२ टक्के एवढे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सर्वांधिक दूषित पाण्याचे प्रमाण ए विभागांत २.१ टक्के तर त्यानंतर अंधेरी पूर्व विभागांत १.७ टक्के, माहिम-दादर या विभागांत १.२ टक्के एवढे पाण्याचे नमुन दूषित आढळून आल्याचे महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
महापालिका जलअभियंता विभागाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०२२-२३ ते मार्च २०२३-२४ या कालावधीतील दूषित पाण्याच्या नमुन्यांचा विभागवार टक्केवारीचा आढावा घेतला तर मागील वर्षांच्या तुलनेत चालू वर्षांत दूषित पाण्याच्या नमुन्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अनेक वस्त्यांमध्ये महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचे प्रमाण फारच अल्प असून अनेक वस्त्यांमध्ये घरगल्ल्या आणि तुंबलेल्या पाण्यातून गळक्या आणि फुटक्या जलवाहिनी जात असल्याने त्यातून इमारतीला किंवा वस्त्यांना दूषित पाणीपुरवठा होतो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Water)
(हेही वाचा – गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची; Sushilkumar Shinde यांच्या वक्तव्याने काँग्रेसची गोची)
सर्वांत जास्त दूषित पाणी नमुन्यांची प्रशासकीय वॉर्ड
- ए विभाग : २.१ टक्के
- जी उत्तर विभाग : १.२ टक्के
- के पूर्व विभाग १.७ टक्के
- बी विभाग : १.० टक्के
- ई विभाग : ०.०६ टक्के
सर्वांत कमी दूषित पाणी नमुन्यांचे प्रशासकीय वॉर्ड
- पी उत्तर विभाग : ०.० टक्के
- एस आणि एन विभाग : ०.१ टक्के
- एफ उत्तर विभाग : ०.१ टक्के
- के पश्चिम विभाग : ०.०२ टक्के
- आर उत्तर विभाग : ०.०२ टक्के
- सी अँड डी विभाग : ० .०२ टक्के
दूषित पाण्याच्या नमुन्यांची टक्केवारी
- सन २०२१- २२ : ०.३३ टक्के
- सन २०२२ -२३ : ०.९९ टक्के
- सन २०२३ -२४ : ०.४६ टक्के (Water)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community