राज्यातील सह्याद्री घाटात मेघगर्जनेसह ऐन मार्च महिन्यात पाऊस तर काही भागांत गारांचा मारा सुरु असतानाच गुरुवारी उत्तर कोकणातील बहुतांश भागांत तापमानात चांगलीच वाढ नोंदवली गेली. मुंबईतील मुलुंड आणि पवईमध्ये कमाल तापमानाची नोंद ३८.१ अंश सेल्सिअसवर पोहोचली तर मिरा-भाईंदरमध्ये कमाल तापमानाची झळ ३८.२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवली गेली. मुंबई व नजीकच्या परिसरात उष्णतेच्या लाटांसारखी परिस्थिती उद्भवल्याचा अनुभव कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या प्रत्येकाला येत होता.
मुंबईतील राम मंदिर तसेच विरार येथे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. उद्या मुंबईतील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. ९ मार्चलाही मुंबईतील कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते. मार्च महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील कमाल तापमानाच्या तुलनेत सध्याचे कमाल तापमान पाच अंशाने जास्त नोंदवले जात आहे.
( हेही वाचा : अलर्ट! पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद! )
मुंबईतील किमान तापमानाचा रॅकोर्ड
मुंबईत आज गुरुवारी किमान तापमान २४ अंस सेल्सिअसवर नोंदवल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. हे तापमान गेल्या तीन वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वात जास्त किमान तापमानातील तुलनेत तिस-या स्थानावर होते. २०२० साली मार्च महिन्यात किमान तापमान २५ मार्च रोजी २६ अंश सेल्सिअवर पोहोचले होते. त्यानंतर २९ मार्च २०२१ रोजी २४.९ अंश सेल्सिअसवर किमान तापमानाची नोंद होती.
उष्णतेच्या दाहापासून शरीराचे संरक्षण करा
– ऐन कडक उन्हांत शक्यतो बाहेर जाणे टाळा
– घराबाहेर जायचे असल्यास टोपी किंवा शाल डोक्यावर घ्या
– सतत पाणी प्या, शरीरात पाण्याची कमतरता होता कामा नये, याची काळजी घ्या
– तहान लागल्यास फळांचा ज्यूस किंवा ग्लुकोज पावडरही सोबत घ्या. चक्कर आल्यासारखे वाटल्यास ग्लुकोजचे पाणी किंवा लिंबू सरबताचे सेवन करा