ऐन मार्च महिन्याच्या पंधरवड्यात कोकण आणि किनारपट्टीतील अंतर्गत भाग तप्त सूर्यकिरणांनी होरपळत असताना वेधशाळेच्या स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमानाची नोंद अद्यापही संशयास्पद दिसत आहे. मुंबईत शहर किनारी भागांत गुरुवारी उष्णतेची लाट बऱ्यापैकी नियंत्रणात असताना अंतर्गत भागांत स्वयंचलित केंद्रातील तापमान नोंद जास्तच आढळून आली. विक्रोळी,मुलुंड, पवई आणि मुंबई महानगर परिसरातील कर्जत या भागांतील कमाल तापमानाची नोंद सलग तिसऱ्या दिवशी चाळीस अंशापुढे नोंदवली गेली.
( हेही वाचा : यंदाही धुळवडीला मिळणार नाही जादा पाणी! )
गुरुवारी नोंदलेल्या कमाल तापमानातील नोंदीत कर्जतमधील कमाल तापमानाची नोंद चक्क ४६.६ अंश सेल्सिअसवर पोहोचली. मुंबईतील विक्रोळीत ४४.५ अंश सेल्सिअस , मुलुंडमध्ये ४२ अंश सेल्सिअस तर पवईत ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. नजीकच्या घाटकोपरमध्ये कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्याउलट मुंबई किनारपट्टीवरील कुलाबा या वेधशाळेच्या केंद्रात कमाल तापमान ३६ तर सांताक्रूझ केंद्रात ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली.
किनारपट्टी आणि अंतर्गत भागांतील कमाल तापमानातील फरकाचे कारण
सध्या राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्ण वा-यांचा प्रभाव सुरु आहे. या भागांत उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. या वा-यांचा किनारपट्टीतील अंतर्गत भागांतही प्रभाव आहे. मात्र समुद्रकिना-यावरील हवेमुळे किनारपट्टीतील शहरांमधील कमाल तापमान गुरुवारपासून नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कुलाबा आणि सांताक्रूझ खालोखाल रत्नागिरी ३३.३, अलिबाग, ३३,३ आणि डहाणूतही ३३.४ आणि हरणाई ३२.४ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान खाली उतरले आहे. या भागांत कमाल तापमान अधिका-यांच्या देखरेखीखाली मोजले जाते. मात्र किनारपट्टीतील अंतर्गत भागांत स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित आहेत. या केंद्राची नेमकी ठिकाणे वेधशाळा जाहीर करत नाही. बहुतांश स्वयंचलित यंत्रणा रेल्वे स्थानकांजवळ उभारण्यात आली आहेत. त्यातील कमाल तापमानातील फरक आणि अधिका-यांच्या देखरेखीतील कमाल तापमान मोजणीचा फरक यातील नेमके कारण अद्यापही वेधशाळा अधिका-यांकडून स्पष्ट झालेला नाही. याप्रकरणी ‘हिंदूस्थान पोस्ट’ने मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंत सरकार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कर्जतमधील स्वयंचलित केंद्र गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. हे केंद्र गेल्या महिन्यापासून कार्यान्वित झाले आहे. या केंद्रातील कमाल तापमान आणि नजीकच्या ठिकाणातील खासगी हवामान अभ्यासकांच्या मोजणीतील कमाल तापामनातील फरक गेल्या तीन दिवसांपासून चार ते पाच अंशाच्या फरकाने नोंदवला जात आहे. वेधशाळा अधिकारी खासगी अभ्यासकांच्या तापमान नोंदणीला प्रमाण मानत नाहीत.
मुंबईतील इतर अंतर्गत भागांतील आणि महानगर परिसरातील कमाल तापमानाची नोंद
चेंबूर – ४०.९ अंश सेल्सिअस, ठाणे – ४२.५ अंश सेल्सिअस, बदलापूर – ४२.९ अंश सेल्सिअस, कोपरखैराणे – ४२.३ अंश सेल्सिअस, डोंबिवली – ४२.८ अंश सेल्सिअस, कल्याण आणि भिवंडी – ४३ अंश सेल्सिअस, उल्हासनगर – ४२.८ अंश सेल्सिअस पनवेल – ४२.७ अंश सेल्सिअस
या केंद्रातील बहुतांश कमाल तापमानाची नोंद खासगी अभ्यासकांकडून केली जाते. काही ठिकाणी संबंधित पालिकेची स्वयंचलित केंद्रे तर कित्येक ठिकाणी खासगी हवामान अभ्यासक तापमानाच्या नोंदीचा अभ्यास करत आहेत.
Join Our WhatsApp Community