स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये पुन्हा लग्नसराई, तर कोविड यंत्रणा क्षय रुग्णांच्या सेवेत

88

मागील मे महिन्यामध्ये कोविड रुग्णांचा भार वाढल्यानंतर दादरमधील ज्या स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये कोविडचे एचडीयू रुग्णालय उभारण्यात आले, त्याठिकाणी आता सनई चौघड्यांचा सूर ऐकायला मिळत आहेत. कोविड काळात ज्या वास्तूमध्ये अत्यंत निरय शांतता आणि भीतीचे वातावरण पसरले होते, तिथे आता मंगलमय वातावरण पहायला मिळत आहे. मात्र, याठिकाणी उभारण्यात आलेल्या रुग्णालयातील सर्व सामग्री आता शिवडीतील क्षयरोग अर्थात टी.बी रुग्णालयात हलवण्यात आली असून या माध्यमातून या रुग्णालयात नवीन मध्यवर्ती श्वसन उपचार केंद्र उभारुन तेथील रुग्णांना उपचाराच्या सुविधा पुरवल्या जात आहेत.

Shivaji Park 3

कोविड एचडीयू रुग्णालय

माहिम व दादरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सिनेअभिनेता अजय देवगण यांच्या एनवाय फाउंडेशन आणि इतर बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने दादर छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान(शिवाजीपार्क) येथे स्काऊट अँड गाईडमध्ये कोविड एचडीयू रुग्णालय उभारण्यात आले होते. कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी या स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने २५ रुग्‍णशय्या क्षमतेच्या या ‘कोविड एचडीयू’ (हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट) या रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन हिंदुजा रुग्‍णालयाकडून करण्यात येत होते. एप्रिल २०२०मध्ये हे रुग्णालय सुरु करण्यात येत होते. मागील वर्षी कोविड करता याच स्काऊट अँड गाईडमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यानंतर ते बंद करण्यात आले होते.

Shivaji Park 1

अतिदक्षता उपचार सुविधा

दादर परिसरातील रुग्‍णांसाठी अतिदक्षता उपचार सुविधा निर्माण करण्‍याच्या उद्देशाने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्‍वाल यांनी जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर यांना निर्देश दिले होते. त्यानुसार दिघावकर यांनी स्काऊट अँड गाईड हॉलचा ताबा घेत तिथे रुग्णालयाची निर्मिती केली होती. हिंदुजा रुग्णालयाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या २० खाटांच्या या रुग्णालयांमध्ये पाच खाटा या व्हेंटीलेटरच्या तर पंधरा खाटा या आयसीयूच्या होत्या.

( हेही वाचा : वरळी कोळीवाड्यात पोलीस तैनात, कोळीबांधव संतापले )

क्षयरुग्णांवर मोफत उपचार

मागील महिन्यांपासून दादर- माहिममधील कोविड रुग्णांची संख्या दहाच्या खाली असून, स्काऊट अँड गाईडने आपली वास्तू रिकामी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार येथील कोविड एचडीयू अर्थात हाय डिपेन्डन्सी युनिट रुग्णालयातील यंत्रणा आता शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग उपचार रुग्णालयात स्थलांतरीत करून नवीन मध्यवर्ती श्वसन उपचार केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी सिनेअभिनेता अजय देवगणसह इतर निर्मात्यांनी १ कोटी १० लाख रुपयांची मदत केली होती. आता याच वैद्यकीय यंत्रणेच्या साहाय्याने क्षयरुग्णांवर अधिक प्रभावीपणे मोफत उपचार केले जाणार असल्याचेही दिघावकर यांनी स्पष्ट केले.

लग्नसराईसाठी तयार

कोविड रुग्णालय बंद झाल्यानंतर स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये पहिला आंतरपाट धरण्यात आला आणि मंगलाष्टकांसह सनई चौघड्यांचा सूर गुंजू लागला. शनिवारी पहिले लग्न या हॉलमध्ये पार पडले. कोविडच्या काळात आधी विलगीकरण केंद्र आणि त्यानंतर रुग्णालय सुरु झाल्यानंतर शिवाजीपार्कमधील जनताही या हॉलच्या परिसरातून अंतर राखून चालायची. परंतु, शनिवारपासून पुन्हा एकदा हा हॉल जुनी ओळख निर्माण करण्यासाठी लग्नसराईसाठी नटून थटून तयार झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.