राज्यात शनिवार-रविवार कडकडीत लॉकडाऊन! काय ठरले कॅबिनेट बैठकीत? वाचा…

133

राज्यातील बिकट झालेली कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार का, असे वातावरण निर्माण झाले होते. त्याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत अखेर निर्णय झाला आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार, रविवार संपूर्ण राज्यभरात कडकडीत लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तर इतर दिवशी रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. उद्यापासून हे कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी (५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई), तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार आहेत. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत असे लक्षात आले, तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

WhatsApp Image 2021 04 04 at 6.54.47 PM

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच

सार्वजनिक व खाजगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खाजगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी योग्यरित्या मास्क घातलेला असेल तरच प्रवास करता येईल. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत, तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खाजगी कार्यालये बंद

खाजगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

WhatsApp Image 2021 04 04 at 6.54.50 PM

मनोरंजनाची ठिकाणे, सलून्स बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. तसेच राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर्स सुद्धा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.

प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद

सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थनास्थळे बाहेरुन येणारे भक्त व दर्शनार्थींसाठी बंद राहतील. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा-अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे लागेल.

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर, ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल. बाहेरील व्यक्तींसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासनाला ते पूर्णपणे बंद करण्याची परवानगी आहे.

WhatsApp Image 2021 04 04 at 6.54.51 PM

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत, याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी. चित्रीकरण सुरू ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नयेत. तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.

आजारी कामगाराला काढता येणार नाही

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.

तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास, ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल. तसा फलक लावला जाईल, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी असेल.

(हेही वाचाः उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी… काय म्हणाले मुख्यमंत्री?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.