रेल्वे लोकलमधून प्रवास करताना डोळा लागला म्हणून उतरायच्या ठिकाणांपासून पुढच्या स्थानकापर्यंत गेल्याचे प्रकार बहुतांशी रेल्वे प्रवाशांच्या जीवनात घडले आहेत. परंतु स्थानक आले तरी एकही प्रवाशी उतरला नाही आणि पुढच्या स्थानकात जाऊन उतरला, असाही प्रकार सोमवारी नालासोपारा रेल्वे स्थानकावर घडला. नालासोपा-याला सोमवारी रात्री ११.१६ ची वातानुकूलित(ए.सी)लोकल आली, स्थानकावर थांबली, पण त्याचा एकही दरवाजा उघडल गेला नाही. दरवाजा उघडला गेला नसतानाही मोटरमन लोकल सुरु केली आणि नालासोपारा स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना चक्क विरारवारी घडवली. त्यामुळे मोटरमनच्या विरोधात प्रचंड संताप प्रवाशांनी व्यक्त केला.
चर्चगेट स्थानकावरुन रात्री ०९.५७ ला सुटणारी एसी लोकल (७०२६) जलद मार्गावरील सर्व स्थानके घेत रात्री सव्वा अकरा वाजता नालासोपारा स्थानकात पोहोचली. लोकल स्थानकावर थांबल्याने सर्व प्रवाशी उतरण्याच्या तयारीत होते. पण बऱ्याच प्रतीक्षेनंतरही या लोकलचे दरवाजे उघडले गेले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच चुळबूळ सुरु झाली. दरवाजे उघडतील या प्रतीक्षेत असतानाच मोटरमनने लोकल सुरु करत पुढच्या स्थानकाच्या दिशेने प्रवासाला सुरु केली. त्यानंतर प्रवाशांनी लोकलमधील मोटरमनशी संवादाशी असलेल्या यंत्रणेद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत लोकलने नालासोपारा स्थानक सोडले होते. परंतु मोटरमनने, आपण दरवाजे उघडले होते असे सांगण्याचा प्रयत्न केला. एसी लोकलचे सर्व दरवाजे एकाच बटणावर उघडले जातात आणि तांत्रिक दोषामुळे एक दोन दरवाजे उघडले तरी काही प्रवाशी उतरायला हवे होते. पण एकही दरवाजा उघडला न गेल्याने सर्वच प्रवाशी आत अडकले आणि विरार स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर उतरल्यानंतर, संतप्त प्रवाशांनी मोटरमॅनच्या कॅबिनबाहेर जोरदार आंदोलन करत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
( हेही वाचा: एसटी महामंडळाचे ‘सुरक्षितता अभियान’ ११ जानेवारीपासून होणार सुरू )
प्रवाशांनी मोटारमनला सुनावले खडे बोल
मोटरमनच्या चुकीमुळे नालासोपा-यातील प्रवाशांना विरारवारी घडवल्याने प्रवाशांचा राग अनावर झाला होता. त्यामुळे संतप्त जमावाला पाहून अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण करत मोटरमनला सुरक्षा देण्यात आली. रात्रीच्या वेळी चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलची संख्या कमी असल्याने नालासोपाऱ्यातील प्रवाशांनी मोटरमनशी हुज्जत घालण्याऐवजी परतीची गाडी पकडण्याची लगबग केली. कारण रात्री उशिरा परतीची लोकल न मिळाल्यास प्रत्येक प्रवाशाच्या खिशाला तीनशे ते पाचशे रुपयांची फोडणी पडणार होती. त्यामुळे विरारमधील प्रवाशांनी मोटरमनचा चांगला समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.
Join Our WhatsApp Community