पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) नव्या रेल्वे रुळ जोडणीसाठी ब्लॉक सुरू झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. रेल्वे प्रवासाचा त्रास टाळण्यासाठी अनेकांनी रस्तेमार्गाचा वापर स्वीकारला, पण वाहतूक कोंडी आणि सेवेच्या दरवाढीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
रविवारपासून (२९ ऑक्टोबर) ते शुक्रवारपर्यंत (३ नोव्हेंबर) रोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द राहणार असून २०० फेऱ्यांना लेटमार्क लागणार असल्याने नव्या आठवड्यात प्रवाशांना त्रास सहन करतच प्रवास करावा लागणार आहे.
खार ते गोरेगावदरम्यान रेल्वे रूळजोडणीचे काम सुरू असले, तरी त्याचा परिणाम चर्चगेट ते विरार, डहाणू रोडसह मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरही दिसून आला. पश्चिम रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवाशांनी रस्तेमार्गे प्रवासाचा पर्याय निवडला.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती)
रेल्वेच्या ब्लॉकचा प्रवाशांना फटका
रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांनी रस्तेमार्गाचा पर्याय अवलंबला, मात्र रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीमुळे प्रवासी नाहक हैराण झाले. वातानुकूलित लोकलमधून ७० रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी अॅपआधारित टॅक्सीतून तिप्पट पैसे मोजावे लागले. रविवारपासून शुक्रवारपर्यंत संपूर्ण आठवडा याच पद्धतीने प्रवास करावा लागणार असल्याने पैशासोबत प्रवाशांचा वेळही वाया जात आहे.
बेस्ट प्रशासनाकडून वाढीव फेऱ्या
बेस्ट प्रशासनाकडून वाढीव फेऱ्या चालवण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेवरील आगारप्रमुखांना देण्यात आल्या, मात्र बोरिवली, अंधेरी, मालाड, कांदिवली, वांद्रे स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली. ब्लॉकमुळे काही मार्गांवर शेअर रिक्षा धावत आहेत. शेअर रिक्षा चालकांकडून नियमापेक्षा जास्त पैशांची मागणी होत असल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. संबंधित रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे तसेच मीटर रिक्षा-टॅक्सीने प्रवास करताना मीटरप्रमाणेच पैसे द्यावे. काही रिक्षाचालक ब्लॉकचे कारण सांगून जास्त पैशांची मागणी करत आहे. असा प्रसंग घडल्यास त्याची माहिती आरटीओ प्रशासनाला देण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
Join Our WhatsApp Community