पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या २६ लोकलचा १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक लोकलमध्ये २५ टक्के अतिरिक्त आसनक्षमता असेल. या सर्वा गाड्या २१ नोव्हेंबरपासून धावणार आहेत.
( हेही वाचा : हिवाळी अधिवेशनाला रेल्वेने जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार गैरसोय?)
१५ डब्यापर्यंत विस्तार
पश्चिम रेल्वेमार्गावरील एकूण २६ लोकलचा १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्यात येणार असून यात जलद मार्गावरील १० गाड्यांचा समावेश आहे असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. सध्या एसी लोकलसह दिवसभरात १ हजार ३७८९ लोकल रोज पश्चिम रेल्वे मार्गावर धावतात. दरम्यान लोकलचा १५ डब्यापर्यंत विस्तार होणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक
कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी तब्बल २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर (शनिवार/रविवार) रोजी मध्य रेल्वे मार्गावर असणार आहे. कर्नाक पुलाचे पाडकाम सुरू असताना सीएसएमटी ते भायखळा दरम्यान शॅडो ब्लॉक घेण्यात येईल. यासाठी विविध विभागाचे एकूण १ हजार कर्मचारी कार्यरत असणार आहे. रेल्वे रुळ स्लीपर्स बदलणे, मेल-एक्स्प्रेस फलाटासंबंधी कामे करण्याचे नियोजन आहे असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२७ तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वेचे बदलले वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
( हेही वाचा : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ‘२७ तासांचा’ मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले )
Join Our WhatsApp Community