सकाळच्या वेळी लोकांची कामाला जाण्याची घाई असते. अशा वेळी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे अनेकदा प्रवासी लोकलमधून पडून जखमी होतात. लोकलमधून पडून होणा-या अशा अपघातांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. गर्दीच्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास ती घटना ‘अनुचित घटना’ च्या कक्षेत येईल आणि त्याबाबत रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायामूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडल्यामुळे पायाला दुखापत झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीला 3 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश पश्चिम रेल्वेला दिले.
उच्च न्यायालयात आव्हान
नितीन हुंडीवाला हे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात खाली पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचा, दावा त्यांनी याचिकेमध्ये केला. हे प्रकरण रेल्वे कायद्याच्या कलम 124 (ए) च्या तरतुदींखाली येत नाही, असा पश्चिम रेल्वेने युक्तीवाद केला. न्यायमूर्ती डांगरे यांनी मात्र रेल्वेचा यु्क्तीवाद ग्राह्य धरण्यास नकार दिला. नोव्हेंबर 2011 मध्ये गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पाय घसरल्यानंतर हुंडीवाला यांना झालेल्या दुखापतीमुळे, त्यांनी पश्चिम रेल्वेकडून 4 लाख नुकसान भरपाईची मागणी केली होती. हा दावा फेटाळला गेल्यानंतर, त्यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. हुंडीवाला यांनी दावा केला की, या लोकल अपघातामुळे त्यांना अजूनही त्रास सहन करावा लागत आहे.
( हेही वाचा: पामतेल 25 रुपयांनी महागले: फरसाण, वेफर्सचेही दर वाढणार )
तर रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागणार
या सुनावणी वेळी निर्णय देताना उच्च न्यायालय म्हणाले की, मुंबईतील लोकल गाड्यांना शहराची लाईफलाईन असे संबोधले जाते. लोकल रेल्वेतून प्रवास करणा-या मुंबईतील रहिवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचण्यासाठी वेळोवेळी धोका पत्करावा लागतो. त्यामुळे या लोकलमधून घसरुन दुखापत झालीच, तर ती अनुचित घटना म्हणून ग्राह्य धरली जाईल व रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागेल.