पश्चिम रेल्वेने स्थानकांमध्ये लिफ्ट बसवल्या आहेत. मात्र त्या लिफ्टमध्ये ज्या सूचना लावल्या आहेत, त्या राज्याची मातृभाषा मराठीमध्ये नाहीत. त्यामुळे पश्चिम रेल्वेला मराठी भाषेचे वावडे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हिंदी, इंग्रजी आणि गुजराती, मराठी मात्र नाही
पश्चिम रेल्वेतील उपनगरीय रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. त्या लिफ्टमध्ये जर प्रवासी अडकले तर काय करावे, कुणाला संपर्क करावा, काय खबरदारी घ्यावी इत्यादी सूचना करणारा सूचना फलक लिफ्टमध्ये लावण्यात आला आहे. त्यामध्ये या सर्व सूचना हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत देण्यात आल्या आहेत. त्या सूचना मराठी भाषेत दिलेल्या नाहीत. त्यामुळे राज्याची मातृभाषा असलेल्या मराठीचे रेल्वेला वावडे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठी भाषिक सर्वांनाच या तिन्ही भाषेचे ज्ञान असेलच असे नाही. आता या सूचना फलकाचा फोटो सर्वत्र व्हायरल होत असून ‘मुंबईतील बोरीवली/कांदिवली रेल्वे स्टेशनच्या लिफ्टमध्ये त्रिसूत्री भाषा, मराठी गायब?’ अशा शब्दांत टीका होत आहे. या प्रकरणी हिंदुस्थान पोस्टने पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्याशी चर्चा केली असता, राज्याची भाषा म्हणून मराठीत सूचना असणे गरजेचे आहे, याविषयी आपण माहिती घेऊन कळवतो’, असे सांगितले.