BKC येथे जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून लवकरच मिळणार दिलासा! काय आहे योजना?

119

मुंबईत राहणारे सर्वच नागरिक नोकरीकरता वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबईच्या लोकलवर अवलंबून असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ही दोन अशी ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी सर्वाधिक कॉर्पोरेट ऑफिस हब असल्याने तेथे लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये, बीकेसी हे मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक बनले आहे. अशातच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेकडून लवकरच दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.

दररोज कामासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पश्चिम रेल्वे (WR) वांद्रे स्थानकावर सुरू होणार्‍या किंवा समाप्त होणार्‍या लोकलच्या सेवांचा विस्तार करण्याचा विचार करत असून पश्चिम रेल्वे याकरता योजना देखील आखत असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांचे मते, या योजनेमुळे केवळ मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन चांगलेच होणार नाही तर गर्दीच्या वेळेत अधिक लोकल ट्रेनचे पर्याय उपलब्ध होतील.

(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या या पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)

दरम्यान, नोकरी आणि कामासाठी चर्चगेट ऐवजी वांद्रे, मालाड आणि अंधेरी भागात जाणाऱ्या ऑफिसच्या गर्दीत लक्षणीय बदल झाला आहे. हा ट्रेंड लक्षा घेता विरार, अंधेरी आणि बोरिवली भागातून वांद्रेपर्यंत आणि तसेच उलट दिशेने अधिक सेवा देण्याच्या हेतूने काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर यामुळे गर्दीचे उत्तम व्यवस्थापन होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

मिश्रा पुढे असेही म्हणाले की, पश्चिम रेल्वे लवकरच जोगेश्वरी टर्मिनससाठी एक निविदा प्रसिद्ध करणार आहे. जी मुख्यतः बाहेरच्या गाड्यांसाठी असणार असून ज्या जोगेश्वरीपासून सुरू होणाऱ्या असतील किंवा त्यांचा प्रवास तिथेच संपणार असेल. हे टर्मिनस राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकादरम्यान असणार असून हे शहरातील असे 7 वे टर्मिनस ठरणार आहे. या टर्मिनसच्या बांधकामासाठी साधारण 70 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. याकरता ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून टेंडरिंग प्रक्रियेसह एकूण स्टेशनचे सर्वेक्षण सुरू आहे.  या नव्या टर्मिनसमुळे मुंबई सेंट्रल येथील गर्दी कमी होईल आणि गाड्या जोगेश्वरी येथून सोडता येऊ शकतात, असे मिश्रा यांनी सांगितले.

शिवाय, बोरिवली आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या लाईन टाकण्याचे काम पूर्णत्वास येत असल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा 25% वाढणार आहेत. खार आणि गोरेगाव दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल, गोरेगाव आणि बोरिवली दरम्यानचा दुसरा टप्पा मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि खार ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा शेवटचा टप्पा मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मिळतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.