मुंबईसह राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दिवसागणिक रुग्ण संख्या वाढते आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. त्यातच कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आल्याबरोबर अनेक जण थेट खासगी रुग्णालयात दाखल होऊन रुग्णालये भरत आहेत. परिणामी अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी खाटा रिकाम्या मिळत नाहीत. त्यामुळे १ एप्रिल रोजी नाशिक येथे एका कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णाला सर्वत्र फिरूनही कुठल्याच रुग्णालयात जागा मिळाली नाही, म्हणून अखेर त्याचा मृत्यू झाला. यास्तव राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोणत्या कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घ्यायचे आणि कुणाला गृहविलगीकरणामध्ये पाठवायचे, याबाबत नवीन नियमावली बनवली आहे. त्यावरून आता एखाद्याला कोरोना झाला तर रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरण्यापूर्वी त्याला या निकषावरून वैद्यकीय सल्ल्याने निर्णय घेणे सोपे जाणार आहे. प्रशासनाने सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतच गृहविलगीकरण आणि रुग्णालयात दाखल करण्याचे निकष काय आहेत, हे प्रसिद्ध केले आहेत.
गृह विलगीकरणाचे निकष!
- रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत नसतील.
- सौम्य लक्षणे असलेले परंतु सहव्याधी नसलेले.
- सहव्याधी असलेले परंतु वैद्यकीय सल्ल्याने परवानगी घेतलेले.
- १०० डिग्री सेल्सिअस ताप आणि ९५ पर्यंत ऑक्सिजन लेवल असलेले.
- रुग्णाकडे ऑक्सीमीटर, ताप मापक, मास्क, ग्लोज असावेत असणे अनिवार्य.
- रुग्णाने दिवसातून २ वेळा त्याच्या तब्येतीची माहिती संपर्कात असलेल्या डॉक्टरांना देणे.
(हेही वाचा : राज्य सरकार वर्क फ्रॉम होम सक्तीचे करणार?)
रुग्णालयात दाखल होण्याचे निकष!
- रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असेल.
- ऑक्सिजन लेवल ९५ पेक्षा कमी झालेली असणे.
- २४ तास १००.४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक ताप राहणे.
- ६ मिनिटे चालल्यावर दम लागत असेल, शरीराला वेदना होत असतील.
- तीव्र अंगदुखी, छातीवर दाब, कफ झाल्यास, संभ्रमावस्था, बोलण्यात संदर्भहीनता असणे.
-
अशक्तपणा जाणवणे, उदासीनता वाटणे, कोणत्याही अवयवाच्या प्रणालीवर परिणाम झालेला असणे.
काय आहे डॉक्टरांची जबाबदारी?
- गृहविलगीकरण केलेल्या रुग्णालयाच्या दारावर फलक लावणे.
- संबंधित इमारतीचे सेक्रेटरी/चेअरमन यांना रुग्णाबाबत कळवणे.
- रुग्णाच्या हातावर शिक्का मारणे, रुग्णाला ५व्या आणि ७व्या दिवशी संपर्क करणे.
- या कालखंडात रुग्णामध्ये लक्षणे दिसू लागतात, त्यामुळे त्यावर पुढील उपचार करणे.