बापरे! क्रिप्टो करन्सीचा व्यवहार १ हजार ६३५ अब्ज डॉलर

69

भारतात क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता नसली तरी ही बाजारापेठ वेगाने वाढत आहे. बिटकॉइन, इथेरियम या क्रिप्टो करन्सी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. भारतात जवळपास १२ ते १५ आभासी चलनाची खरेदी-विक्री कार्यरत आहे. देशात क्रिप्टोचा दैनंदिन व्यापार जवळपास ५०० ते १५०० कोटी पर्यंत आहे. तर, जागतिक बाजारपेठेत क्रिप्टो करन्सीचे बाजार भांडवल १ हजार ६३५ अब्ज डॉलर एवढे आहे आणि यात एकट्या बिटकॉईनचे भांडवल ५० लाख ५७ हजार ५६१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचडीएफसी या भारतातील सहा मोठ्या कंपन्याच्या समभागांच्या एकत्रित रकमेपेक्षा आभासी चलनाचे मूल्य अधिक आहे.

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?

  • क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन अर्थात हे चलन भौतिक स्वरुपात अस्तित्वात नसते. चलनी नोटांना पर्याय म्हणून या आभासी चलनाचा उपयोग केला जातो. क्रिप्टो करन्सी केवळ व्हर्च्युअल व ऑनलाईन उपलब्ध असते.
  • लाइटकॉइन, रिपल, इथेरिअम, डॉजकॉइन, कॉइन्ये, नेम, डॅश, मोनेरो, ब्लॅककॉइन, बिटकॉईन या क्रिप्टो करन्सी प्रसिद्ध आहेत. यातील बिटकॉईन ही करन्सी साधारण दशकापूर्वी लॉंच करण्यात आली होती.

बिटकॉईनचा इतिहास

२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉईन’ची संकल्पना जन्माला घातली. २०१९ मध्ये बिटकॉईनचे मूल्य जवळपास ९ हजार डॉलर इतके झाले. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे एका बिटकॉईनची किंमत जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतकी होती. आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसेच इथेही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते. बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या तसेच कोणत्याही इतर बाबींचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.

( हेही वाचा : क्रिप्टो करन्सीवर बंदी आणण्यासाठी हालचाली! किंमती गडगडल्या )

भारतातील परवानगी?

एप्रिल २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टो करन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजेच बँकांच्या व्यवहारात कोणत्याच ऑनलाईन व्यवहारांचा समावेश नसेल किंवा त्या निगडीत सेवा देता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले होते. पण २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाने आभासी चलनाच्या व्यवहारांना परवानगी दिली होती. आता येत्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोवर बंदी आणावी, असे विधेयक सादर होणार आहे. भारतातील क्रिप्टो करन्सी बिटकॉईनचे आजचे दर ३७ लाख ९२ हजार २४१ रुपये, तर इथेरिअम हे आभासी चलन २ लाख ८५ हजार ८८२ रुपये एवढे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.