भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकीपॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या आजाराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार असून १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो या देशात आढळला होता. ‘ऑर्थोपॉक्स व्हायरस’ या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार होतो.
( हेही वाचा : १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ)
आजाराची लक्षणे : ताप येणे, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो. या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे ३ ते ६ टक्के आहे.
आजाराचा प्रसार : व्यक्ती-व्यक्तीमध्ये थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव, तसेच बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीला मंकीपॉक्स आजार होण्याची शक्यता जास्त आहे.
संशयित रुग्णांची ओळख : मागील ३ आठवड्यात मंकी पॉक्स बाधित देशांमध्ये किंवा राज्यामध्ये प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर अचानक पुरळ उठणे, सूजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीला संशयित रुग्ण म्हणून ओळखले जाते.
संभाव्य रुग्ण : ज्या कारणाने या आजाराचा प्रसार, संसर्ग होतो अशा प्रकारचा संपर्क संशयित रुग्णांशी आलेली व्यक्ती संभाव्य रुग्ण मानण्यात येते.
निश्चित निदान तंत्र : प्रयोगशाळेत पी.सी.आर. चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते. मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाच्या कपड्यांशी अथवा अंथरुण-पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थांमध्ये मंकी पॉक्स रुणांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे आदी काळजी घ्यावी.
Join Our WhatsApp Communityनागरिकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वेळी ज्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करीत होतो. त्याचप्रमाणे सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकी पॉक्ससदृश लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ विलगीकरण करावे. तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे. आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. – डॉ. अशोक नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे