युवकाच्या मेंदूला झिणझिण्या, तपास यंत्रणेला डोकेदुखी! काय आहे ‘एमडी’चा दुष्परिणाम?

120

भारतात अडीज ते तीन हजार रुपये ग्रॅम या भावाने बेकायदेशीररित्या विकले जाणारे, ‘एमडी’अर्थात मफेड्रोन या अमली पदार्थाने कोकेन, हेरॉईन, हशिश सारख्या पार्टी ड्रग्सला मागे टाकत नशेच्या बाजारात आपले स्थान पटकावले आहे. कॉलेज तरुणापासून कॉर्पोरेट क्षेत्र आणि बॉलिवूडमध्ये ‘एमडी’ची मोठी क्रेझ आहे. युवकाच्या मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या एमडीने तपास यंत्रणेची डोकेदुखी मात्र वाढवली आहे.

९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये कोकेन, हेरॉईन, हशीश या ड्रग्सचा बोलबाला होता, मात्र सध्या एमडी या ड्रग्सची मोठी क्रेझ बॉलिवूडमध्ये बघायला मिळत आहे. एमडीची वाढती मागणी बघता अनेक केमिकल प्लांटमध्ये बेकायदेशीररीत्या एमडी तयार करून देशभरात तसेच परदेशात बेकायदेशीरपणे त्याची विक्री केली जात आहे. एमडी ड्रग्सने अमली पदार्थाच्या धंद्यात असणाऱ्या टोळ्यांनाच नव्हे तर अंडरवर्ल्डला देखील भुरळ घातली असून एनसीबीने वर्षभरापूर्वी मुंबईत केलेल्या कारवाईत एमडीच्या बेकायदेशीर धंद्यात अंडरवर्ल्ड कनेक्शनदेखील समोर आलेले आहे.

बॉलिवूड आणि उच्च्भ्रूमध्ये कोकेन, हेरॉईन, हशिश यासारख्या पार्टी ड्रग्सची ९०च्या दशकात वेगळे स्थान होते, हे ड्रग्स म्हणजे त्याकाळी सर्वात महागडे ड्रग्स म्हणून ओळख होती. बॉलिवूड स्टार संजय दत्त, फरदिन खान या सारख्या कलाकारामुळे हेरॉईन, कोकेन या ड्रग्सचे बॉलिवूड कनेक्शन समोर आले होते. ड्रग्सच्या आहारी गेलेला संजय दत्त हा सर्वांना आठवत असेल, त्याचबरोबर जेष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा अभिनेता मुलगा फरदीन खान याला ड्रग्स सेवन प्रकरणात अटक झाल्यानंतर पोलीस यंत्रणांकडून बॉलिवूडची झाडाझडतीत अनेक जणांचे ड्रग्स कनेक्शन समोर आले होते. बॉलिवूडला लागलेली ड्रग्सची कीड अजूनही तशीच असून उलट त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कोकेन आणि हेरॉईन सारख्या पार्टी ड्रग्सची जागा मात्र ‘एमडी’ या अमली पदार्थाने घेतली आहे. मेथिलीनडियोक्सी मेथाएफेटामाइन, म्याव म्याव, मॉली, मफेड्रोन या सारख्या अनेक नावानी ओळखल्या जाणाऱ्या ‘एमडी’ या अमली पदार्था चे जाळे देशभर पसरले असून एमडीची क्रेझ परदेशात देखील जाऊन पोहचली आहे.

(हेही वाचा नुसते स्वराज्य रक्षक नव्हे; ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’!)

मुंबई पोलिसांनी मागील काही वर्षात जप्त केलेल्या अमली पदार्थामध्ये एमडीचे (मेफेड्रोन) सर्वात मोठे प्रमाण असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये ३ हजार ८०० किलोग्रॅम जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थापैकी २ हजार ४५० किलो मेफेड्रोनचा समावेश आहे. या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४८८ कोटी ६५ लाख ७१ हजार एवढी किंमत आहे. ही आकडेवारी केवळ मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईची अधिकृत आकडेवारी असून इतर केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबईत केलेल्या कारवाईची आकडेवारी यापेक्षा मोठी असण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमडी हा अमली पदार्थ महाराष्ट्र, गुजरात आणि दीव दमन येथील केमिकल फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केला जातो, औषधाच्या नावाखाली रासायनिक पदार्थाचा वापर करून एमडी हा अमली पदार्थ तयार केला जातो, एमडी तयार करण्यासाठी मात्र ५० रुपये प्रतिग्रॅम खर्च येतो तर बाजारात एमडी हा दीड हजार ते २ हजार रुपये प्रतिग्रॅमने विकला जातो, त्यानंतर तोच एमडी किरकोळ ग्राहकांना अडीच ते ३ हजार रुपये प्रतिग्रॅमने विकला जात आहे. एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी सुमारे ५० रुपये प्रति ग्रॅम खर्च येतो, तर त्याची विक्री दीड ते दोन हजार रुपये प्रति ग्रॅम दराने विकली जाते.

देशात एमडी ची मोठी बाजारपेठ असून देशात एमडीची मागणी सर्वात अधिक हरियाणा, पंजाब या राज्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन शहरात एमडीची मागणी आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, राज्य एटीएस, एनसीबी, डीआरआय या तपास यंत्रणेने मागील अनेक वर्षांपासून ‘एमडी’ विक्री आणि तस्करी करणाऱ्यांना अटक करून एमडी तयार करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात उध्वस्त करून हजारो किलो एमडी चा साठा जप्त करणात आला आहे. एनसीबी या केंद्रीय यंत्रणेने केलेल्या कारवाईत एमडीच्या धंद्यात अंडरवर्ल्डचे कनेक्शन समोर आले असून याप्रकरणी एनसीबीने अंडरवर्ल्ड संबंधित अनेकांना अटक देखील केली आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग्स अ‍ॅब्युजच्या अहवालानुसार, एमडी हे एक प्रकारचे उत्तेजक ड्रग्स आहे जे एखाद्या व्यक्तीचा मूड बदलून मेंदूमधून हार्मोन्स आणि रसायनांचे प्रमाण वाढवते. परिणामी अश्या व्यक्तीमध्ये असे अनेक बदल होताना दिसून येतात, त्याला नवचैतन्य आल्यासारखे वाटते, त्याला बरे वाटू लागते, परंतु प्रभाव संपल्यानंतर त्याचे दुष्परिणाम देखील दिसून येतात.

(हेही वाचा चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांना किती मतांची मिळाली आघाडी?)

परिणाम

एमडी हे एक सायकोएक्टिव्ह कंपाऊंड आहे, जे घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला नवीन ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते. तो बऱ्यापैकी खूश असल्याचे दिसते, त्याला थकवा जाणवत नाही. त्याची विचारसरणी बदलू लागते. रक्तदाब वाढू लागतो आणि हृदयाचे ठोकेही वाढू लागतात.

दुष्परिणाम 

मेंदूवर एमडीचा परिणाम असा होतो की तो काय बोलत आहे ते स्वतःलाच समजत नाही, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एमडी ड्रग्स घेणाऱ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत जाते. हे औषध दीर्घकाळ घेतल्यास यकृत, मूत्रपिंड आणि हृदय निकामी होऊ शकते. त्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या इतर अनेक भागांवरही होतो. रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. या ड्रग्सचा प्रभाव सहसा ३ ते ६ तासांपर्यंत टिकतो, काही लोकांमध्ये ते जास्त काळ टिकू शकतो. ड्रग्सचा प्रभाव संपल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम एका आठवडा टिकू शकतात. जसे, नैराश्य येणे, पुन्हा ड्रग्स घेण्याची इच्छाहोणे, नीट झोप न लागणे, राग येणे, कशावरही लक्ष केंद्रित न करणे.

एका राजकीय पक्षाची नेतेपदी असलेली अभिनेत्री सोनाली फोगटचा मृत्यु मागच्याच वर्षी गोवा येथे झाला. सोनाली फोगट हिला अतिप्रमाणात एमडी हा ड्रग्स दिल्यामुळे तिचा मृत्यु झाल्याचे जवळपास उघडकीस आले. सोनाली फोगट हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सोनाली फोगटला दीड ग्रॅम एमडी ड्रग दिल्याची कबुली दिली आहे. एखाद्या सेलिब्रिटीला एमडीएमए औषध देण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतलाही हे ड्रग्स दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.