राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्याने चढता आलेख घेतला आहे. त्यामुळे याचसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली. या बौठकीत मास्कसक्तीबाबत कोणताही निर्णय झाला नसून, नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन पु्न्हे एकदा करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले टोपे?
मास्कसक्ती करण्याचा कुठलाही निर्णय या मंत्रीमंडळ बैठकीत झालेला नाही. पण नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे. त्यामुळे मास्क न वापरल्यास आधीसारखी कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. पण स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरुन खबरदारी बाळगावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः मी 2024 ची निवडणूक… मुख्यमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळेंचं नवीन विधान)
घाबरण्याचे कारण नाही
मुंबई,पुणे, ठाणे,रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. सामवारपासूनच या चाचण्या वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 3 टक्क्यांपासून 8 टक्क्यांपर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणा-या रुग्णांपैकी केवळ 1 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे सध्यातरी काळजी करण्याचं कारण नाही.
Join Our WhatsApp Community